महत्वाच्या बातम्या

 देशातील व्याघ्र प्रकल्प शिकाऱ्यांच्या निशाण्यावर : ताडोबा, पेंचसाठी मोठा धोका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : देशात वाघांची संख्या वाढत असतांनाच आता व्याघ्र प्रकल्पच शिकाऱ्यांच्या निशाण्यावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ताडोबा, पेंचसह सातपुडा, कार्बेट, अमनगड, पिलीभीत, वाल्मिकी, राजाजी आणि बालाघाट या वाघांचा वावर असलेल्या परिसरात शिकाऱ्यांनी पुन्हा आपल्या हलचाली वाढवल्याची माहिती केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने देत रेड अलर्ट दिला आहे.

मध्य प्रदेशातील कटनी येथील बहेलिया या शिकारी टोळ्यांनी सात-आठ वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या व्याघ्र प्रकल्पात उच्छाद मांडला होता. मेळघाट, ताडोबा, पेंच या व्याघ्रप्रकल्पात २०-२५ वाघांची शिकार केली होती. याप्रकरणी वनविभागाकडून शंभराहून अधिक शिकाऱ्यांना अटक झाली. त्यामुळे शिकाऱ्यांचा वावर कमी झाल्याने वन खातेही निश्चिंत झाले आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा शिकाऱ्यांनी डोके वर काढले आहे. मध्य प्रदेशातील सातपुडा व्याघ्र प्रकल्पातील चोरना गाभा क्षेत्रातील एका जलाशयात वाघाचा मृतदेह सापडला असून तो शिकाऱ्यांनीच मारला असल्याचा संशय आहे. या घटनेनंतरच केंद्रीय वन्यजीव गुन्हे शाखेने सर्व व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकांना आणि अभयारण्यासह लगतच्या क्षेत्राशी संबंधित अधिकाऱ्यांना सतर्क केले आहे.

संवेदनशील भागात गस्त वाढवण्याचे निर्देश -

शिकाऱ्यांच्या संघटित टोळ्या व्याघ्र क्षेत्राभोवती सक्रिय झाल्या आहेत. त्यामुळे तंबू, मंदिरे, रेल्वे स्थानक, बस स्थानके, पडक्या इमारती, सार्वजनिक निवारा स्थळे या ठिकाणी संशयितपणे फिरणाऱ्या भटक्या लोकांची चौकशी करावी. संवेदनशील भागांमध्ये गस्त वाढवावी. तसेच पोलीस ठाण्याच्या संपका&त राहून त्यांच्यासोबत माहितीची देवाणघेवाण करावी, असे निर्देश केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने दिले आहेत.

स्थानिकांना सोबत घेणे आवश्यक -

केंद्रीय वन्यजीव गुन्हे नियंत्रण शाखेने अलर्ट दिला म्हणजे यात नक्कीच गंभीर आहे. यात काही विशिष्ट व्याघ्र प्रकल्प व वनक्षेत्राचा उल्लेख असला तरीही व्याघ्र केंद्रित सर्वच क्षेत्रांनी हा इशारा गांभीर्याने घ्यायला हवा, असे राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते यांनी म्हटले आहे.





  Print






News - World




Related Photos