चंद्रपूरातून विशाल मुत्तेमवार यांची माघार, काँग्रेसच्या दुसऱ्या उमेदवाराची आज घोषणा होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
चंद्रपूर लोकसभा निवडणुकीसाठी  काँग्रेसचे संभाव्य उमेदवार म्हणून माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांचे पुत्र विशाल मुत्तेमवार यांचं नाव जवळपास निश्चित होतं. मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतल्याने काँग्रेसच्या डोक्याचा ताप वाढला आहे.  विशाल यांनी निवडणुकीतून अंग काढून घेतल्याची कुणकुण लागल्यानेच काँग्रेसने चंद्रपूरचा उमेदवार अजून घोषित केलेला नाही.  आज २२  मार्च रोजी   उमेदवार जाहीर होईल  अशी माहिती प्राप्त झाली आहे. 
काही दिवसांपूर्वी विशाल मुत्तेमवार यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना मला पक्षाना हिरवा झेंडा दाखवला असून कामाला लागण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं होतं. विशाल मुत्तेमवार हे नागपूरचे असून ते चंद्रपुरातून निवडणूक लढवणार असल्याचं कळताच चंद्रपुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या संभाव्य उमेदवारीला विरोध करायला सुरुवात केली. हा विरोध आपला पराभव करू शकतो हे कळाल्याने विशाल मुत्तेमवार यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की आपण चंद्रपुरातून निवडणूक लढवणार नाही. एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना मुत्तेमवार म्हणाले की “माझी या मतदारसंघासाठी निवड केल्याबद्दल महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांचे मी आभार मानतो मात्र चंद्रपुरातील स्थानिक  काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांनी मी बाहेरचा आहे असं सांगत माझ्यासाठी काम करण्यास नकार दिला. या नाराजीमुळे दगाफटका होऊन काँग्रेसचा या मतदारसंघात पराभव होऊ नये यासाठी मी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेतली आणि माझ्याऐवजी दुसरा उमेदवार देण्याची विनंती केली. ”
मंगळवारी रात्री काँग्रेसने विदर्भातील चार उमेदवारांची नावे जाहीर केली होती. नागपूरमधून नाना पटोले, गडचिरोलीमधून नामदेव उसेंडी, यवतमाळमधून माणिकराव ठाकरे तर वर्ध्यामधून चारुलता टोकस यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-22


Related Photos