मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात विशेष शिबिरांचे आयोजन


- १९, २०, २६ व २७ सप्टेंबर रोजी मतदान केंद्रांवर सुविधा; नवमतदार, महिला व दिव्यांग नागरिकांनी नोंदणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात नवमतदार, महिला आणि दिव्यांग नागरिकांच्या मतदार नोंदणीसाठी १९, २०, २६ व २७ सप्टेंबर २०२६ रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांचा जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी लाभ घेऊन मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. यामध्ये नवीन मतदार नोंदणीसह मतदार यादीतील नोंदींमध्ये आवश्यक दुरुस्ती तसेच पात्रतेनुसार नावे वगळण्यासंबंधी अर्ज स्वीकारण्यात येतील. विशेषतः १८ ते १९ वर्षे वयोगटातील नवमतदारांची नोंदणी वाढविणे तसेच महिला व दिव्यांग नागरिकांचा मतदार यादीतील समावेश सुनिश्चित करणे, यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.
त्यानुसार गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर ही विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत. ६७-आरमोरी विधानसभा मतदारसंघातील ३०० मतदान केंद्रे, ६८-गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील ३६३ मतदान केंद्रे आणि ६९-अहेरी विधानसभा मतदारसंघातील ३०० मतदान केंद्रांवर ही शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
पात्र नवमतदारांनी मतदार यादीत आपले नाव नोंदवून घ्यावे. तसेच महिला व दिव्यांग नागरिकांनीही या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा. मतदार यादीतील विद्यमान नोंदींमध्ये दुरुस्ती किंवा अन्य आवश्यक बदल असल्यास संबंधित नागरिकांनी या शिबिरांमध्ये अर्ज सादर करावेत.
जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी १९, २०, २६ व २७ सप्टेंबर रोजी आपल्या संबंधित मतदान केंद्रावर आयोजित विशेष शिबिराला भेट देऊन मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.




Petrol Price




