महत्वाच्या बातम्या

 गुंजेवाहीत विद्यार्थ्यांना बाल संरक्षणाचे धडे : महिला सुरक्षेबाबतही जनजागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : किशोरवयीन विद्यार्थ्यांना बाल संरक्षण, महिला सुरक्षा आणि कायदेशीर हक्कांची जाणीव व्हावी, तसेच संकटाच्या प्रसंगी उपलब्ध असलेल्या शासकीय मदत यंत्रणांची माहिती मिळावी, या उद्देशाने जिल्हा परिषद हायस्कूल, गुंजेवाही येथे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.

एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई (बल्लारपूर कॅम्पस) येथील आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि महिला व बालविकास विभाग, चंद्रपूर अंतर्गत कार्यरत सखी वन स्टॉप सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सखी वन स्टॉप सेंटरच्या केस वर्कर राणी खडसे (येलेकर) यांनी विद्यार्थ्यांना महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये उपलब्ध असलेल्या मदतीची माहिती दिली. पीडित महिलांना समुपदेशन, मानसिक आधार आणि कायदेशीर सहाय्य कशा पद्धतीने उपलब्ध करून दिले जाते, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

किशोरवयात घेतलेले चुकीचे निर्णय भविष्यात कायदेशीर अडचणी निर्माण करू शकतात, याकडेही विद्यार्थ्यांचे लक्ष वेधण्यात आले. १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या प्रेमप्रकरणांशी संबंधित कायदेशीर बाबी, पोक्सो कायदा आणि बाल लैंगिक अत्याचारापासून संरक्षण याबाबत विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत माहिती देण्यात आली. अडचणीच्या प्रसंगी चाईल्ड हेल्पलाईन १०९८ वर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचीही माहिती देण्यात आली. बालसंगोपन योजना, कायदेशीर दत्तक प्रक्रिया, अनाथ प्रमाणपत्र योजना तसेच त्यातून मिळणाऱ्या शासकीय सवलती याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

बालकांचे हक्क आणि सुरक्षितता जपण्यासाठी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या यंत्रणांचा योग्य वेळी वापर करणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या दबावाला किंवा अडचणीला बळी न पडता विश्वासू व्यक्ती, शिक्षक किंवा संबंधित शासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा, असा संदेशही देण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद हायस्कूल, गुंजेवाहीचे मुख्याध्यापक विनोद कोवे होते. प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक प्राध्यापिका श्रद्धा किन्नाके यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन सोनटक्के यांनी केले.

विद्यार्थ्यांना बाल संरक्षण आणि महिला सुरक्षेबाबत कायदेशीर माहिती मिळाल्याने हा उपक्रम जनजागृतीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.





  Print






Related Photos