मुंबईतील हिमालय पादचारी पूल कोसळून ६ जणांचा मृत्यू , ३० जण जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : 
महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३० जण जखमी झाले.जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असून मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. 
 नरिमन पॉइंट, चर्चगेट आणि आसपासच्या परिसरातील कार्यालयांमधील नोकरदार मंडळी पूर्व उपनगरांत आपल्या घरी जाण्यासाठी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात येत असतात. त्यामुळे या परिसरात नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. त्याच वेळी या परिसरात वाहनांचीही गजबज असते. हिमालय पादचारी पुलाचा साठ टक्क्य़ांहून अधिक भाग गुरुवारी सायंकाळी ७.२० च्या सुमारास अचानक कोसळला आणि एकच गोंधळ उडाला.
पूल खाली पडताच पुलावरून जाणारे काही पादचारीही त्यासोबत कोसळले. हा भाग काही मोटारगाडय़ांवर कोसळून त्यांचेही नुकसान झाले. घटनेचे वृत्त समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.  या दुर्घटनेत अपूर्वा प्रभू ( ३५), रंजना तांबे (४०), सारिका कुलकर्णी (३५), तपेंद्र सिंग (३५), जाहीद सिराज खान (३२)  आणि मोहन कायगडे (५५)  या सहा जणांचा मृत्यू झाला. अपूर्वा प्रभू आणि रंजना तांबे या जी. टी. रुग्णालयातील परिचारिका आहेत. जखमींना सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले.

जखमींमध्ये सोनाली नवले (वय ३०), अद्वित नवले (३), राजेंद्र नवले (३३), राजेश लोखंडे (३९), तुकाराम येडगे (३१), जयेश अवलानी (४६), महेश शेरे, अजय पंडित (३१), हर्षदा वाघले (३५), विजय भागवत (४२), निलेश पाटवकर, परशुराम पवार, मुंबलिक जयस्वाल, मोहन मोजडा (४३), आयुशी रांका (३०), सिराज खान (५५), राम कुपरेजा (५९), राजेदास दास (२३), सुनील गिरलोटकर (३९), अनिकेत अनिल जाधव (१९), अभिजीत मान (२१), राजकुमार चावला (४९), सुभेष बॅनर्जी (३७), रवी लागेशेट्टी (४०), नंदा विठ्ठल कदम (५६), राकेश मिश्रा (४०), अत्तार खान (४५), सुजय माझी (२८), कनुबाई सोलंकी (४७), दीपक पारिख यांचा समावेश आहे.ही दुर्घटना घडल्यानंतर या परिसरात बघ्यांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यात निवडणुकीच्या तोंडावर ही दुर्घटना झाल्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांनीही धाव घेतली. त्यामुळे या परिसरात एकच गोंधळ उडाला होता आणि मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते.

या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केले आहे. पालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्तांशी चर्चा करून जखमींना त्वरित योग्य ते उपचार मिळण्याची खबरदारी घेण्याचे आदेश त्यांनी दिले. पूल दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-03-15


Related Photos