दहा वर्षांपासून बेपत्ता बालकांचा अखेर शोध : गोंदिया एएचटीयूची उल्लेखनीय कामगिरी


- ६३ अपहरण प्रकरणांचा तपास; विविध राज्यांत शोधमोहीम राबवत बेपत्ता व्यक्तींचा घेतला शोध
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : जिल्ह्यातील बेपत्ता बालकांचा शोध घेण्यासाठी गोंदिया पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (एएचटीयू) केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. या कक्षाने आतापर्यंत तब्बल ६३ अपहरण प्रकरणांचा तपास हाताळला असून, कौशल्यपूर्ण तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे अनेक बेपत्ता बालकांचा शोध घेण्यात यश मिळविले आहे. विशेष म्हणजे, सालेकसा आणि गोरेगाव पोलिस ठाण्यांत दाखल असलेल्या तब्बल दहा वर्षांपासून प्रलंबित दोन प्रकरणांतील बेपत्ता बालकांचा शोध** घेण्यात पोलिसांना यश आले आहे.
गोंदिया जिल्ह्यात १ फेब्रुवारी २०२१ रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यातील १६ पोलिस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या आणि चार महिन्यांपेक्षा अधिक काळ प्रलंबित असलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यांचा तपास वरिष्ठांच्या आदेशानुसार या कक्षाकडे वर्ग केला जातो. प्रत्येक प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करून बेपत्ता व्यक्तींचा ठावठिकाणा शोधण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न केले जातात.
दहावीच्या परीक्षेत अपयश, मुंबईत सुरू केला उदरनिर्वाह -
गोरेगाव पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या एका प्रकरणात सन २०१३ मध्ये दहावीच्या परीक्षेत अपयश आल्याने नाराज झालेला १६ वर्षीय मुलगा घरातून निघून गेला होता. त्याने विनातिकीट रेल्वेने मुंबई गाठली. सुरुवातीला रेल्वे स्थानक परिसरात साफसफाईचे काम करून त्याने उदरनिर्वाह सुरू केला. त्यानंतर भोजन तयार करण्याचे काम शिकून तो स्वतःचा उदरनिर्वाह करू लागला.
मुलगा घरातून निघून गेल्यानंतर पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्याचा शोध घेण्याचे प्रयत्न केले; मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही. कालांतराने हे प्रकरण एएचटीयूकडे वर्ग करण्यात आले.
एएचटीयूच्या पथकाने गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळवून तपासाची दिशा निश्चित केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने थेट मुंबई गाठली आणि रेल्वे स्थानक परिसरात शोध घेतला. अखेर तब्बल दहा वर्षांपासून बेपत्ता असलेल्या त्या मुलाचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले.
पोलिसांनी संवाद साधल्यानंतर त्याने दहावीच्या परीक्षेत दोन विषयांत नापास झाल्यामुळे नाराज होऊन गाव सोडल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला गोंदियात आणून कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. दहा वर्षांनंतर मुलगा पुन्हा समोर आल्याने पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
१३ वर्षांची मुलगी मध्य प्रदेशात सापडली -
सालेकसा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुसरे प्रकरणही तब्बल दहा वर्षांपासून प्रलंबित होते. सन २०१४ मध्ये १३ वर्षीय मुलगी शिक्षणासाठी मध्य प्रदेशातील आजी-आजोबांकडे गेली होती. तिचे आई-वडील नागपूर येथे राहत होते. कामाच्या व्यापामुळे त्यांचे मुलीकडे अपेक्षेइतके लक्ष राहिले नाही.
दरम्यान, नागपूरमध्ये शेजारी राहणाऱ्या एका ३४ वर्षीय वाहनचालकाशी मुलीची ओळख वाढली. त्याने मुलीला मोबाइल दिल्यानंतर दोघांमध्ये संवाद वाढला. शाळेला सुटी असताना ती त्याच्यासोबत निघून गेली. पुढे संबंधित व्यक्तीने तिला मध्य प्रदेशातील आपल्या गावात नेऊन तिच्याशी विवाह केला.
मुलगी परत न आल्याने आजी-आजोबांनी चौकशी सुरू केली. त्यानंतर २०१७ मध्ये अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तिचा शोध घेण्यासाठी उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्यात आली होती.
सुरतपासून कोलकात्यापर्यंत शोधमोहीम -
प्रकरण एएचटीयूकडे आल्यानंतर पोलिसांनी तपासाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढविली. मुलीचा शोध घेण्यासाठी सुरत, हैदराबाद, कोलकाता, रांची, पुणे, मुंबई, नागपूर आणि अकोला यांसह विविध ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली. तसेच रेडलाईट परिसरातही तपास करण्यात आला.
अखेर गुप्त बातमीदाराकडून मुलीने नाव बदलून मध्य प्रदेशात वास्तव्य केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीची खातरजमा केल्यानंतर एएचटीयूच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने मध्य प्रदेश गाठले. तेथे शोध घेतला असता ती तीन अपत्यांची जबाबदारी सांभाळताना आढळून आली.
अनेक राज्यांत पोलिसांचा तपास -
बेपत्ता बालक आणि व्यक्तींचा शोध घेण्यासाठी एएचटीयूने महाराष्ट्राबरोबरच मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, हरियाणा, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, झारखंड, छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही तपास केला आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा सातत्याने पाठपुरावा, गुप्त माहितीदारांचे जाळे, स्थानिक पोलिसांशी समन्वय आणि प्रत्यक्ष शोधमोहीम यांच्या माध्यमातून एएचटीयूने केलेली ही कामगिरी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. दहा वर्षांनंतर बेपत्ता व्यक्तींचा ठावठिकाणा लागल्याने संबंधित कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला असून, बेपत्ता बालकांच्या शोधासाठी पोलिसांच्या प्रयत्नांना यामुळे नवी दिशा मिळाली आहे.




Petrol Price




