अपघातानंतर मृत्यू झालेल्या तरुणाच्या आत्म्याला घरी नेण्यासाठी मांत्रिकाकडून रुग्णालयात पूजा


वृत्तसंस्था / अजमेर :  राजस्थानमधील अजमेर येथे   अंधश्रद्धेचा एक भयानक प्रकार  घडल्याचे समोर आले आहे. अपघातानंतर येथील जेएलएन रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या आत्म्याला घरी नेण्यासाठी रुग्णालयात गर्दी केली व त्याला बोलावण्यासाठी चक्क मांत्रिकाकडून पूजा करून घेतल्याचे समोर आले आहे.
काही दिवसांपूर्वी येथील बरोडा गावात राहणाऱ्या तरुणाच्या गाडीला अपघात झाला .यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला जेएलएन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईक त्याचा मृतदेह घरी घेऊन गेले व त्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.  यास दोन दिवस उलटल्यानंतर ९ मार्च रोजी अचानक मृत तरुणाचे नातेवाईक एका मांत्रिकाला घेऊन पुन्हा रुग्णालयात आले. तरुणाला ज्या वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले होते. त्या वॉर्ड बाहेर मांत्रिकाने पूजा मांडली व तो तिथेच होम हवन करू लागला. हे बघून रुग्णांसह डॉक्टरांनाही धक्का बसला. त्यांनी याबद्दल मृत तरुणाच्या घरातल्यांना विचारता तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले खरे पण त्याचा आत्मा मात्र येथेच राहील्याचे व त्याला परत घरी नेण्यासाठी आम्ही आल्याचे नातेवाईकांनी सांगितले. हे ऐकून डॉक्टर चक्रावले . त्यांनी हा अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचे व गेलेला मुलगा कधीही परत येणार नाही हे त्याच्या नातेवाईकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण कोणीही त्यांचे ऐकले नाही.
त्यानंतर मांत्रिकाने वॉर्डबाहेरच तंत्र मंत्राची पूजा मांडली व त्याने आत्म्यास समोर येण्याचे आवाहन केले. हे पाहताच इतर रुग्ण मात्र हादरले. तब्बल दोन तास ही पूजा सुरू होती. त्यानंतर मांत्रिकाने हवेत हात फिरवत हातात काहीतरी पकडल्याचा बनाव केला व ते मडक्यात सोडल्याचा अभिनय केला. त्यानंतर मडक्याला लाल फडका गुंडाळून यातील मुलाचा आत्मा घराच्या कोपऱ्यात नीट जपून ठेवण्याच्या सूचना मुलाच्या नातेवाईकांना दिल्या. त्यानंतर ते मडके घेऊन नातेवाईक घरी गेले.  Print


News - World | Posted : 2019-03-10


Related Photos