लोकसभा निवडणुकीची घोषणा आज होण्याची शक्यता, ५ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन


वृत्तसंस्था /  नवी दिल्ली :  केंद्रीय निवडणूक आयोगाने आज संध्याकाळी दिल्लीतील विज्ञान भवन येथे ५ वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन केले असून, आज २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. 
लोकसभा निवडणुकीसोबतच आंध्र प्रदेश, सिक्कीम, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणाही आजच होण्याची शक्यता आहे. मात्र, जम्मू-आणि काश्मीर विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबतच होईल किंवा कसे हे स्पष्ट झालेले नाही. 
विद्यमान लोकसभेचा कार्यकाल ३ जूनला समाप्त होत आहे. निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर पुढील आठवड्यात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी निवडणूक पर्यवेक्षकांची बैठक आयोजित केली जाईल. 
प्राप्त  माहितीनुसार, पहिल्या टप्प्यातील मतदानासाठीची अधिसूचना मार्च अखेरीला जारी होऊ शकते. त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मतदान घेण्यात येईल अशी शक्यता व्यक्त होत आहे. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मतमोजणी होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीसोबतच जुन्या शिरस्त्यानुसार आंध्र प्रदेश, ओडिशा, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका घोषित करेल अशी दाट शक्यता व्यक्त होत आहे. 
जम्मू-काश्मीर विधानसभा बरखास्त झाली आहे. यामुळे निवडणूक आयोगाला मे महिन्यात समाप्त होत असलेल्या सहा महिन्यांचा कालावधीत विधानसभा निवडणूक घोषित कराव्या लागणार आहेत. यामुळेच जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक लोकसभा निवडणुकीसोबतच घोषित होतील अशीही शक्यता काहीजण व्यक्त करत आहेत.    Print


News - World | Posted : 2019-03-10


Related Photos