महत्वाच्या बातम्या

 पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत एसएनडीटी महिला विद्यापीठात पर्यावरणपूरक गणपती निर्मिती स्पर्धा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : पर्यावरण संवर्धनाची भावना विद्यार्थिनींमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने एसएनडीटी महिला विद्यापीठ, बल्लारपूर कॅम्पसच्या सांस्कृतिक विभागातर्फे पर्यावरणपूरक गणपती मूर्ती निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

स्पर्धेत विद्यार्थिनींनी विविध पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून आकर्षक, कलात्मक आणि सर्जनशील गणपती मूर्ती साकारल्या. मूर्ती निर्मितीतून विद्यार्थिनींनी पर्यावरण संरक्षणासोबतच नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर आणि सर्जनशीलतेचा संदेश दिला.

कार्यक्रमाला विद्यापीठाचे संचालक डॉ. रागेश इंगोले, उपकुलसचिव डॉ. बाळू राठोड, समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त तसेच रणरागिणी हिरकणी फाउंडेशनच्या सदस्या श्रेया व्यास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींच्या कलाकृतींचे कौतुक करत त्यांच्या पर्यावरणपूरक दृष्टिकोनाला प्रोत्साहन दिले. विद्यार्थिनींनी सादर केलेल्या विविध मूर्तींमधून त्यांची कल्पकता आणि कलागुण दिसून आले.

स्पर्धेचा प्रथम क्रमांक नीलिमा पोटे, स्नेहा निरंजने आणि अनुष्का इंगळे यांनी पटकावला. द्वितीय क्रमांक पायल मल्लोडे आणि अमिक्षा हर्षे, तर तृतीय क्रमांक लक्ष्मी यादव, प्रियांका भोयर आणि स्वामिनी गुरनुले यांनी मिळविला.

या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची जाणीव निर्माण होण्यासोबतच पर्यावरण संरक्षण आणि नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनाबाबत जागरूकता वाढली. विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका अर्चना ताजणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापिका अश्विनी वाणी यांनी केले.





  Print






Related Photos