महत्वाच्या बातम्या

 सिरोंचा तालुक्यातील तलाव होणार गाळमुक्त


- गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना

- जि.प. माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते योजनेचा शुभारंभ

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिरोंचा : शेतकऱ्यांची शेतजमीन सुपीक व्हावी व तलावात साचलेला गाळ देखील उपसला जावा यासाठी शासनातर्फे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना राबविली जात आहे. सिरोंचा तालुक्यातील रामंजापूर येथे माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांच्याहस्ते गाळ उपसण्याच्या कामाचे शुभारंभ करण्यात आले. यावेळी येथील नायब तहसीलदार सय्यद हमीद, येथील सरपंच सारक्का जेका,शाखा अभियंता सलमान पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लुरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कृष्णमूर्ती रिक्कुला, रवी रालाबंडीवार, एम.डी. शानु, देवा येनगंदूला, अशासकीय संस्थेचे अध्यक्ष पंकज नौनूरवार, ग्रा.प. सदस्य बापू तालापल्ली, पोलीस पाटील चंद्रमोलु दागम, संजीव रेड्डी गद्धे, नारायण पालारपू आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य हे देशात सर्वात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य असून या धरणामध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या व तलावांच्या साठवणूक क्षमतेत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. या धरणामध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरविल्यास धरणांची मूळ साठवणूक क्षमता पुनर्प्रस्थापित होण्याबरोबरच कृषी उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. ही बाब विचारात घेऊन गाळमुक्त तलाव व गाळयुक्त शिवार ही योजना पुन्हा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने योजनेचा लाभ देण्यासाठी अर्ज मागविले जात आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सिरोंचा तालुक्यातील रामंजापूर, चिंतलपल्ली, मंडलापूर, तेकडा मोटला या चार ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला असून  रामंजापूर येथील तलावातील गाळ उपसण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मृद, जलसंधारण विभाग तथा अविष्कार बहुउद्देशीय विकास मंडळ, गडचिरोली कडून हे काम केले जाणार आहे.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना शेतकऱ्यांच्या हिताची असून शेतजमिनीला नवी संजीवनी देणारी आहे. यामुळे शेतीसाठी पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील काही प्रमाणात निकाली निघेल. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन ही योजना आपापल्या गावात राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा. - भाग्यश्री आत्राम जि.प. माजी अध्यक्ष गडचिरोली





  Print






News - Gadchiroli




Related Photos