अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना वेळेत शिष्यवृत्ती द्या : रामशंकर कथेरीया


 - अनुसूचित जाती जमातीसाठी असलेल्या योजनांचा आढावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर  :
अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ  वेळेत देण्याच्या सूचना  अनुसूचित आयोगाचे अध्यक्ष रामशंकर कथेरीया यांनी केली.  विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष  रामशंकर कथेरीया यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया तसेच गडचिरोली जिल्ह्याचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या सदस्या डॉ. सुश्री स्वराज विद्वान, निर्देशक डॉ. ओमप्रकाश बेडेकर, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, गडचिरोलीचे शेखर सिंग, चंद्रपूरचे कुणाल खेमनार, वर्धेचे शैलेश नवाल, गोंदियाच्या श्रीमती कादंबरी बलकवडे, मनपा आयुक्त अभिजित बांगर,   प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण सिध्दार्थ गायकवाड, उपायुक्त संजय धिवरे, पोलिस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश केदार, शिक्षणाधिकारी शिवलिंग पटवे, जिल्हा महिला बाल विकास अधिकारी भागवत तांबे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिक पूर्व तथा मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काचा यावेळी आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी करावयाच्या ऑनलाईन प्रक्रियेचा निपटारा लवकरात-लवकर करावा तसेच पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकुल योजनेंबाबत अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांचे उद्दीष्ट  लवकरच पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्यात.  ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत घडलेल्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण करुन पिडीतांना नियमानुसार लाभ द्यावे या अंतर्गत नोकरी, घर तसेच शासकीय नियमानुसार सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. या संदर्भात शासकीय अभियोक्त्यांनी देखील न्यायालयीन प्रकरणांचा तातडीने निपटारा करुन पिडीतांना न्याय मिळवून द्यावा, असे श्री. रामशंकर कथेरीया यावेळी म्हणाले.
अनुसूचित जातीच्या सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून सोडवावे, असेही ते यावेळी म्हणाले. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी विभागात झालेल्या कामांची माहिती यावेळी सादर केली.  Print


News - Nagpur | Posted : 2019-01-19


Related Photos