महत्वाच्या बातम्या

 वर्धा : विनोबांची भूमी पवनार येथे धाम नदी संवाद यात्रेचे स्वागत


-  चला जाणूया नदीला अभियान

-  धाम नदी संवाद यात्रा परिक्रमा

- भाऊसाहेब थुटे यांचे प्रबोधन किर्तन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : भूदान चळवळीचे प्रणेते, हजारो भूमिहिनांचा हक्काची जमीन उपलब्ध करून देणाऱ्या आचार्य विनोबा भावे यांच्या पवनार या पुण्यभूमित धाम नदी संवाद यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. गावकरी, महिला, विद्यार्थी यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. गावातून जलजागृती रॅली काढण्यात आली. पवनार येथे आगमण झाल्यानंतर ग्रामपंचायत सभागृहात मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शालिनी संजय आदमने होत्या. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून धाम नदी समन्वयक मुरलीधर बेलखोडे, सुनील रहाणे तसेच उपसरपंच राहुल पाटणकर, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. नदीच्या उगमापासून संगमापर्यंत नदी संवाद यात्रेचा प्रवास सुरु आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत ग्रामपंचायत सदस्य, गावातील ज्येष्ठ नागरिक व युवकांचा मोठा सहभाग होता. नदी प्रदूषित होण्याची कारणे व त्यावर उपाय गावकऱ्यांनी सुचवावे, असे मुरलीधर बेलखोडे यांनी सांगितले. नद्यांविषयी तांत्रिक माहिती समन्वयक सुनील रहाणे यांनी दिली. नदी समन्वयक विणेश काकडे, सतीश इंगोले, विजय आढाव, अजय रोकडे, काजल रोकडे, प्रज्वल डुकरे, गीता इखार, पवन महल्ले यांनी धाम नदीच्या समस्येविषयी विस्तृत माहिती दिली. धाम नदी आश्रम परिसरास प्रत्यक्ष भेट देऊन नदीच्या विविध समस्या जाणून घेण्यात आल्या.

संवाद यात्रेदरम्यान पवनार येथे प्रसिद्ध सप्त खंजिरी वादक भाऊसाहेब थुटे यांच्या किर्तनाचा जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. किर्तनाला बाळकृष्णाची हांडे व दामोदर राऊत यांची उपस्थिती होती. भाऊसाहेब थुटे यांनी चला जाणूया नदीला अभियानाचे अनेक पैलू उलगडले तर उगमापासून  झालेला अभ्यास व प्रत्यक्ष परिस्थितीवर आपल्या सप्तखंजिरी वादनाच्या माध्यमातून प्रभावी भाषेतून प्रबोधन केले. नद्या वाचल्या तर आपण वाचणार आहोत. ज्यांना ज्यांना पिण्यासाठी पाणी पाहिजे त्या सगळ्यांनी अभियानात सहभागी व्हावे. गावकऱ्यांच्या सहभागानेच अभियान यशस्वी होणार असल्याचे भाऊसाहेब थुटे यांनी सांगितले. मनोरंजनातून प्रभावी जलप्रबोधन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य शारदा वाघमारे, सविता पेटकर, गीता ईखार, राजेंद्र बावणे, नितीन कवाडे, पत्रकार श्रीकांत तोटे, कृषी मित्र प्रशांत भोयर, ग्रामविकास अधिकारी ए.व्ही.डमाळे, कृषी सहाय्यक टी.व्ही.वैद्य यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन सतीश इंगोले यांनी केले तर आभार माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन कवाडे यांनी मानले.





  Print






News - Wardha




Related Photos