महत्वाच्या बातम्या

 आजही आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समजून घेण्याच्या भूमिकेत


- प्रा- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांचे प्रतिपादन; नवरगाव येथे शारीरिक शिक्षण विभागाची एकदिवसीय कार्यशाळा 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : भारतातील शिक्षण व्यवस्थेत व्यापक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने सन २०२० मध्ये लागू करण्यात आलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महाराष्ट्रात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून अंमलात आले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीला काही वर्षे उलटली असली, तरी त्यातील विविध तरतुदी, बदल आणि संधी समजून घेण्याच्या प्रक्रियेत आजही आपण आहोत, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे प्रा- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांनी केले.

सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील श्री ज्ञानेश महाविद्यालयात गुरुवारी १० सप्टेंबर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली तसेच श्री ज्ञानेश महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन करताना डॉ. कावळे मार्गदर्शन करीत होते.

डॉ. कावळे म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षण क्षेत्रात अनेक मूलभूत आणि महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यासाठी प्रत्यक्ष उपस्थितीची अट असते. मात्र, नव्या शैक्षणिक धोरणात ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्याने कोणता ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण केला आहे, त्याची गुणवत्ता आणि त्याचे शैक्षणिक महत्त्व याचाही विचार करणे आवश्यक ठरणार आहे.

नव्या धोरणामुळे विद्यार्थ्यांना एका शाखेतील शिक्षण घेत असताना दुसऱ्या शाखेतील विषय निवडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच काही कारणांमुळे शिक्षणाचा प्रवाह खंडित झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन आपले शिक्षण पूर्ण करण्याची मुभाही या धोरणात देण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे केवळ अभ्यासक्रमातील बदलापुरते मर्यादित नसून संपूर्ण शिक्षणव्यवस्थेत व्यापक परिवर्तन घडवून आणणारे धोरण आहे. या धोरणाचा मसुदा शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांनी अभ्यासणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण संस्थेचे सचिव सदानंद बोरकर होते. गोंडवाना विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाच्या संचालक डॉ. अनिता लोखंडे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेस प्रमुख पाहुणे व विषयतज्ज्ञ म्हणून नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनंजय वेळूकर तसेच डॉ. माधवी मार्डीकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका आणि कार्यशाळेची रूपरेषा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमृत लंजे यांनी प्रास्ताविकातून स्पष्ट केली. त्यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून देत कार्यशाळेच्या उद्देशाची माहिती दिली.

या कार्यशाळेला गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयांमधील शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेतील दोन्ही सत्रांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने शारीरिक शिक्षण विभागाची भूमिका, विभागप्रमुख व संचालकांच्या जबाबदाऱ्या, कार्यभाराचे स्वरूप तसेच बदललेल्या अभ्यासक्रमाची रचना यावर सखोल चर्चा करण्यात आली.

नव्या शैक्षणिक धोरणामुळे शारीरिक शिक्षण क्षेत्रात होणारे सकारात्मक बदल, त्यातील अडचणी, उपलब्ध संधी तसेच महाविद्यालयीन पातळीवर धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करताना येणाऱ्या विविध बाबींवरही उपस्थित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सहभागी प्राध्यापकांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेत विविध प्रश्न उपस्थित केले.

कार्यशाळेतील एका सत्रात डॉ. अनिस खान यांनी तर दुसऱ्या सत्रात डॉ. महेश शर्मा यांनी सत्राध्यक्ष म्हणून भूमिका बजावली. दोन्ही सत्रांमध्ये शारीरिक शिक्षण विभागाशी संबंधित विविध शैक्षणिक व प्रशासकीय बाबींवर साधक-बाधक चर्चा झाली.

उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन डॉ. अस्तिक मुंगमोडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक मनोज अरमरकर यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






Related Photos