शेतकऱ्याला जखमी करून गावाजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याला वनविभागाने केले जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यातील रामाळा येथे रविवारी, १८ ऑक्टोबर रोजी सकाळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यात ५५ वर्षीय शेतकरी देवीदास रामाजी बनसोड जखमी झाले. या घटनेनंतर गावाजवळच बिबट्या असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, वनविभागाने तातडीने बचाव मोहीम राबवत काही तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी सुमारे १० वाजता बिबट्याला पकडण्यात यश मिळविले. त्यामुळे रामाळा परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
ब्रह्मपुरी वनविभागांतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील रामाळा येथे सकाळच्या सुमारास बिबट्याने शेतकरी देवीदास बनसोड यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. गावाच्या जवळच बिबट्या असल्याची माहिती पसरताच नागरिकांमध्ये भीती पसरली. बिबट्याच्या उपस्थितीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सिंदेवाहीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली बोरावार सायंकार यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या पथकाने तातडीने बचाव मोहीम सुरू केली. बिबट्याला सुरक्षितरीत्या पकडण्यासाठी पथकाने प्रयत्न सुरू केले. या मोहिमेदरम्यान वनविभागाचा एक कर्मचारीही जखमी झाल्याची माहिती समोर आली.
परिस्थिती आव्हानात्मक असतानाही वनविभागाच्या पथकाने प्रयत्न सुरूच ठेवले. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी सुमारे १० वाजता बिबट्याला पकडण्यात यश आले. वनविभागाच्या या तातडीच्या कारवाईमुळे रामाळा गावासह परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. या बचाव मोहिमेदरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून सिंदेवाही-वासेरा मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती. बिबट्याला पकडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.




Petrol Price




