नक्षल सेलच्या पोलीस जवानाचा आकस्मिक मृत्यू


- शासकीय इतमामात  अंत्यसंस्कार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /गडचिरोली :
जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या नक्षल सेल मध्ये कार्यरत पोलीस जवान अरुण भुजंगराव कडते यांचा मंगळवारी रात्री ७.१५  वाजताच्या दरम्यान आकस्मिक मृत्यू झाला. मृत्यू समयी ते ४८ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज बुधवारी दुपारी १.३०  वाजताच्या दरम्यान शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 
मंगळवारी अरुण कडते हे आपल्या कार्यालयात बसले असताना अचानक त्यांची प्रकृती बिघडली. यावेळी त्यांना तत्काळ सहकारी कर्मचाऱ्यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव डोंगरे पेट्रोल पपंच्या मागे त्यांच्या घरी आणल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत पोलीस जवानांनी मानवंदना दिली. यावेळी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर कडते यांच्या पार्थिवावर वैनगंगा नदी घाटावर शासकीय इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी कडते यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलींनी मुखाग्नी दिली. कडते यांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, भाऊ, बहीण व बराच मोठा आप्तपरिवार आहे. कडते हे पोलिस दलात दाखल झाल्यानंतर सी- ६० दलात कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी बरीच वर्ष राज्य गुप्तवार्ता विभागात काम केले. त्यावेळी त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेकदा पोलीस विभागाकडून गौरविण्यात आले होते. ते सध्या पोलिस विभागाच्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या नक्षल सेलमध्ये कार्यरत होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे पोलीस दल व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-26


Related Photos