महत्वाच्या बातम्या

 आरोग्य सेवा दत्ताजी मेघे साहेबांच्या कामाची खरी ओळख : बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले


 - दत्ताजी मेघे चौकाचे नामकरण

- आरोग्य व सामाजिक क्षेत्रातील कार्याचा गौरव

- पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांची उपस्थिती

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : दत्ताजी मेघे यांनी वर्धा जिल्ह्याच्या विकासात तसेच आरोग्यसेवा क्षेत्रात दिलेले योगदान अविस्मरणीय आहे. विशेषत कोरोना महामारीच्या काळात त्यांनी आरोग्यसेवेच्या माध्यमातून समाजासाठी मोठे कार्य केले. त्यांच्या कार्याची खरी ओळख त्यांच्या आरोग्यसेवेतील योगदानातून होते, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी केले.

प्रभाग क्रमांक ७ गोंडप्लॉट, बॅचलर रोड परिसरात स्व. दत्ताजी मेघे चौकाच्या नामकरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर, आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाने, आमदार समीर मेघे, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, माजी खासदार सुरेश वाघमारे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संजय गाते, नप सभापती राखी पांडे आदी उपस्थित होते.

दत्ताजी मेघे आणि अभयसिंह राजे भोसले हे समकालीन नेते होते. त्यामुळे मेघे साहेबांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे ही आपल्यासाठी भाग्याची बाब आहे. त्यांच्याशी अनेकदा भेटी झाल्या. त्यांच्या कार्याची जवळून ओळख करता आली, असे मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी सांगितले.

कोरोना महामारीच्या कठीण काळात सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्यसेवा मिळाव्यात यासाठी दत्ताजी मेघे यांनी मोठी आरोग्य व्यवस्था उभी केली. गरीबीतून येऊन त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली,  त्यांच्या कार्यामुळे अनेकांना आधार मिळाला. त्यांनी घडविलेल्या कार्यकर्त्यांना ताकद देत त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचे काम पालकमंत्री डॉ.पंकज भोयर करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वर्ध्याला दत्ताजी मेघे यांच्या माध्यमातून आरोग्यसेवेची मोठी देणगी -
पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दत्ताजी मेघे यांच्या कार्याचा गौरव करतांना सांगितले की, दत्ताभाऊंनी हजारो कार्यकर्ते घडविले. ते प्रत्येक कार्यकर्त्याचे नेते होते आणि त्यांचे लाखो चाहते आहेत. जिल्ह्याला त्यांनी विविध क्षेत्रांत भरपूर दिले असून आरोग्यसेवेच्या क्षेत्रात निर्माण केलेल्या सुविधांचा लाभ नागरिकांना होत आहे. वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्यसेवेच्या क्षेत्रात त्यांनी घेतलेले निर्णय दूरदृष्टीचे होते. वर्ध्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्या निर्णयाचे आज मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले असल्याचे डॉ.भोयर यांनी सांगितले.

आमदार समीर मेघे यांनी कुटुंबाच्या वतीने चौकास दत्ताजी मेघे यांचे नाव दिल्याने नगर परिषदेचे आभार मानले. सन १९९० मध्ये वैद्यकीय महाविद्यालयासाठी नागपूर हा पर्याय समोर असतानाही वर्ध्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. आज त्या निर्णयाचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले असून, हजारो नागरिकांना त्याचा लाभ होत आहे. आरोग्यसेवा देण्याची शपथ घेऊन वडिलांनी उभारलेले हे कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी दत्ताजी मेघे यांनी हजारो कार्यकर्ते घडविल्याचे सांगत त्यांच्या नावाने चौकाचे नामकरण होणे ही वर्धा शहरासाठी अभिमानाची बाब असल्याचे नमूद केले. नगरसेविका श्वेता पाठक यांनी देखील मनोगत व्यक्त केले. सुरुवातीस चौक नामफलकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या नामकरण सोहळ्यास नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






Related Photos