राज्यघटना हाच देशासाठी सर्वात मोठा ग्रंथ : प्रा. ज्ञानेश वाकुडकर


- ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा  : 
देशाचा कारभार कसा चालवावा यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला राज्यघटना दिली. देशात राज्यघटनेशिवाय दुसरा कोणताही ग्रंथ मोठा नाही असे प्रतिपादन साहित्यिक, कवी ,चित्रपट निर्माते ज्ञानेश वाकुडकर यांनी केले.  
 उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धा ग्रंथोत्सव- 2018 चे उदघाटन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे ज्ञानेश वाकुडकर यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अध्यक्षस्थानी आमदार डॉ पंकज भोयर, विदर्भ साहित्य संघाचे वर्धा जिल्हा अध्यक्ष संजय इंगळे तिगावकर, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अस्मिता मंडपे,  निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर  बेलखोडे, प्रा बाविस्कर, श्री फाळके, सुधीर प्रकाशनचे सुधीर गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. 
 या ग्रंथोत्सवामध्ये लावण्यात आलेल्या पुस्तकांच्या स्टॉलचे फित कापून प्रा.  ज्ञानेश वाकुडकर यांनी उदघाटन केले. तसेच मान्यवरांचे हस्ते दीप प्रज्वलन करून ग्रंथोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. 
  पुढे बोलताना प्रा. वाकुडकर म्हणाले, देश कसा चालवावा यासाठी जशी राज्यघटना आहे तसे समाजाच्या जडणघडणीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजानी ग्रामगीता लिहिली आहे.  समाजातील प्रत्येक व्यक्तीने राज्यघटना आणि ग्रामगीता वाचली पाहिजे.  वर्धा विधानसभेचे आमदार डॉ पंकज भोयर यांनी त्यांच्या आमदार निधीतून ग्रंथालयासाठी सभागृह आणि ग्रामीण भागातील ग्रंथालयांना पुस्तकांचा संच दिला. भावी पिढी विचारशील आणि प्रगल्भ व्हावी यासाठी या आमदार निधीचा उपयोग पुस्तकांचा संच देण्यासाठी होत आहे ही कृती सर्व विकासकामांपेक्षा श्रेष्ठ आहे. असे वर्धा जिल्हा मॉडेल सर्वत्र राबवले जायला हवे असेही ते यावेळी म्हणाले.
 विद्यार्थी जीवनात  महाविद्यालयात गेल्यावर ग्रंथालय पाहायला मिळाले हे सांगताना पंकज भोयर म्हणाले,  आमदार झाल्यावर ग्रंथालय सुसज्ज करण्याचा पहिला निर्णय घेतला. या ग्रंथालयात  अनेक सुविधांचा अभाव होता. ही परिस्थिती पाहून इथे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाचन कक्ष  आणि स्पर्धा परिक्षेसाठी पुस्तके दिलीत.  त्यामुळे विद्यार्थी इथे बसून अभ्यास करायला लागलेत. बोलण्यापेक्षा कृतीतून विकास घडवण्यावर विश्वास आहे.  आमदार निधीचा ग्रंथालयापेक्षा दुसरा चांगला उपयोग होऊच शकला नसता.हा निधी ग्रामीण भागातील भावी पिढीच्या उज्वल भविष्यासाठी उपयोगात आणता आला याचा आनंद आहे असे डॉ पंकज भोयर म्हणाले. 
  संजय इंगळे तिगावकर यांनीही ग्रंथोत्सवामध्ये विविध कार्यक्रमाची मेजवानी वर्धेकरांसाठी असून याचा आस्वाद घ्यावा. तसेच पुस्तकांच्या सानिध्यात माणूस विचारशील होतो.  भावी पिढीने या पुस्तकांना आपला मित्र बनवावे असे सांगितले. 
 प्रास्ताविकातून अस्मिता मंडपे यांनी ग्रंथोत्सवाची भूमिका विशद केली. तसेच दोन दिवस चालणारया ग्रंथोत्सवात विविध कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली.
यावेळी आमदार पंकज भोयर याच्या आमदार निधीतून ग्रंथालयांना पुस्तकांचा संच देण्यात आला त्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी ग्रंथदिंडीने शहरात ग्रंथोत्सवाची  वातावरणनिर्मिती केली. बजाज वाचनालयापासून सुरू झालेली ही ग्रंथ  दिंडी वाजत गाजत ग्रंथालय कार्यालयात पोहचली.  संचालन सुषमा कोटेवार यांनी तर आभार  सुधीर गवळी यांनी व्यक्त केले.

   Print


News - Wardha | Posted : 2018-12-22


Related Photos