‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पनेमुळे भारतीयत्वाची भावना वृध्दींगत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई  :
  संघराज्याच्या चौकटीत राहून राज्य सक्षम झाली पाहिजेत. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ अशी संकल्पना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडली. त्याअंतर्गत दोन राज्यांमध्ये उद्योग आणि तत्सम संबंध दृढ होतांनाच एकमेकांमध्ये सांस्कृतिक आदान-प्रदान देखील झाले पाहिजे. त्यामुळे भारतीयत्वाची भावना रुजते असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
  हॉटेल ट्रायडंट येथे रिपब्लीक वृत्त वाहिनीच्या माध्यमातून द सिनर्जी टू सर्ज या विषयावर राज्याचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि आसामचे मुख्यमंत्री सरबानंद सोनवाल यांची मुलाखत या वृत्तवाहिनीच्या सहयोगी संपादक शिवानी गुप्ता यांनी घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
 मराठा आरक्षण, मुंबईची संस्कृती, केंद्र आणि राज्य संबंध, स्थानिक स्वराज्य संस्थेचे बळकटीकरण आदि विषयांवर विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मनमोकळी उत्तरे दिली. ते यावेळी म्हणाले, केंद्र आणि राज्य एकत्रित काम करून भारताच्या विकासाला गती देण्याचे काम करतात. आपली कार्यपध्दती संघराज्यीय असून त्या चौकटीत राहूनच राज्यांनी सक्षम झाले पाहिजे. आता राज्यांना 14 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत आहे. निती आयोग अस्तित्वात आल्यावर कुठल्याही राज्याला केंद्र शासनाकडे याचना करायची वेळ आता येत नाही. 55 टक्के निधी राज्यांना मिळत असल्याने त्याचे विकासामध्ये मोठे योगदान आहे. निती आयोगात विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा चमू निर्णय घेत असल्याने सर्वांना समान निधी वाटप होतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पना मांडली, त्या माध्यमातून दोन भिन्न राज्य एकमेकांशी सांस्कृतिक आदान-प्रदान करित आहे. राजकारणाच्या पलीकडे जावून दृढ होणारे संबंध भारतीयत्वाची भावना निर्माण करतात, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
 स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करतांनाच पायाभूत रस्त्यांसारख्या पायाभूत सुविधांसाठी निधी राज्य शासन उपलब्ध करून देत आहे. मुंबई शहरात गेल्या तीन ते चार वर्षात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची निर्मिती या माध्यमातून झाली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  Print


News - Rajy | Posted : 2018-12-19


Related Photos