महत्वाच्या बातम्या

 बेरडी (जुनी) चे आदर्श पुनर्वसन करणार


- भूखंड वाटप कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येऊ नये, त्यांना सिंचनाचे पाणी मिळावे, यासाठी बेंडारा मध्यम प्रकल्पकरिता बेरडी (जुनी) येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी देऊन त्याग केला आहे. तुमचा हा त्याग कायम स्मरणात ठेवून तुमची काळजी घेण्याची जबाबदारी आता शासनाची आहे. त्यामुळे बेरडी (जुनी) चे आदर्श पुनर्वसन करून येथील नागरिकांना सर्व नागरी सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मनगंटीवार यांनी दिले.

राजुरा तालुक्यातील बेंडारा मध्यम प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील बेरडी (जुनी) येथील नागरिकांना पुनर्वसित भूखंड प्रमाणपत्र वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर माजी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, राजुराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता पद्माकर पाटील, सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी, सुदर्शन निमकर, नामदेव डाहुले, सुनील उरकुडे आदी उपस्थित होते.

येथील नागरिकांचे सर्व प्रश्न नक्कीच सुटेल, अशी ग्वाही देऊन पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले, आदर्श पुनर्वसनाबाबत मनात कोणतीही शंका ठेवू नका. जमिनीचा त्याग करणाऱ्या कुटुंबांना सर्व सोयीसुविधा युक्त पुनर्वसन करून दिले जाणार आहे. येथील आदिवासी कुटुंबांना शबरी घरकुल योजनेतून घरकुल देण्यात यावे. तसेच जे कुटुंब आदिवासी संवर्गात येत नाही, त्यांच्यासाठी इतर ओबीसी संवर्गातून घरकुल उपलब्ध करून देणार. मात्र या योजनेसाठी लाभार्थ्यांनीसुद्धा आग्रही राहावे. पारोमिता गोस्वामी यांनी याबाबत पुढाकार घेऊन गावाला मॉडेल करण्यासाठी प्रयत्न करावे.

कंपन्यांच्या सीएसआर फंडमधून आवश्यक गरजा पूर्ण करण्यात येतील. बचत गटांना रोजगार निर्मिती, मुलांसाठी उत्तम शिक्षण आदी सोयीसुविधा उपलब्ध करून देऊ. हे गाव १०० टक्के निर्व्यसनी करून एक आदर्श प्रस्थापित करा. महाप्रीतच्या माध्यमातून १० हजार घरे बांधण्याचा आपला मानस आहे. यासाठी २ हजार ५०० घरांसाठी ३० कोटी रुपये उपलब्ध झाले, असून पहिला टप्पा सुरू होत आहे. सुंदर घरे, सुंदर मनाची माणसे येथे असेल.

पुढे पालकमंत्री म्हणाले, तेंदूपत्ता बोनसचे आता संपूर्ण ७२ कोटी रुपये मिळणार आहे. कोणताही पैसा कपात केला जाणार नाही. तसेच पेसामधील गावांना वनविभाग तेंदूपत्ता बोनस देऊ शकत नाही. मात्र हा विषय ग्रामविकास विभागाकडे पाठवून बोनससाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.

पुनर्वसनाबाबत प्रास्ताविकातून माहिती देताना कार्यकारी अभियंता वाकोडे म्हणाले, बेंडारा मध्यम प्रकल्पाला १९९० मध्ये पहिली प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील बेरडी (नवीन) चे पुनर्वसन झाले आहे. बेरडी (जुनी) या गावातील १३६ कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात येत आहे. यासाठी ८.६४ हेक्टर जमिनीवर एकूण १७७ प्लॉट आखणी करण्यात आली आहे. यापैकी १३६ कुटुंबांना प्लॉट वाटप करण्यात येईल, तर भविष्यात विस्तारासाठी ४१ प्लॉट ठेवण्यात येतील. या पुनर्वसनात १४ प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असे, त्यांनी सांगितले.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते कौशल्याबाई पेंदोर, अर्जुन मडावी, भीमराव जुगनाके, मायाबाई आरके, महादेव कुंभरे, मंगला मडावी, हरिश्चंद्र तोडासे, रत्नमाला कुंभरे, रवींद्र आदे आणि जानकुबाई मेश्राम या लाभार्थ्यांना भूखंड प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन शितल पाझारे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos