महत्वाच्या बातम्या

  गोंदियात एमडीसह तरुणाला अटक : ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त


- शास्त्री वॉर्डातील घराची झडती घेत पोलिसांची कारवाई; २०.७ ग्रॅम एमडी क्रिस्टल पावडर जप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : शहरातील अमली पदार्थांच्या अवैध विक्रीविरोधात गोंदिया शहर पोलिसांनी कारवाईची मोहीम अधिक तीव्र केली असून, सोमवारी ७ सप्टेंबर शास्त्री वॉर्ड परिसरात केलेल्या कारवाईत एका २६ वर्षीय तरुणाला एमडी क्रिस्टल पावडरसह अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी २०.७ ग्रॅम एमडी क्रिस्टल पावडर जप्त केली असून, तिची किंमत ६२ हजार १०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राहुल हेमराज मंडीया  २६ वर्षे रा. पंचायत समिती कॉलनी, शास्त्री वॉर्ड, गोंदिया असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तो आपल्या राहत्या घरातून एमडी या अमली पदार्थाची विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

गोपनीय माहितीवरून घराची झडती -
गोंदिया शहर पोलिसांचे पथक अवैध धंद्यांविरोधात पेट्रोलिंग करीत असताना राहुल मंडीया याच्याबाबत गोपनीय माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शासकीय पंच, फोटोग्राफर, वजनकाटा मापारी व आवश्यक साहित्य सोबत घेतले.

त्यानंतर शास्त्री वॉर्ड, संजयनगर आणि गोविंदपूर परिसरातील राहुल मंडीया याच्या घराची झडती घेण्यात आली. या झडतीदरम्यान एका पारदर्शक प्लास्टिक पिशवीत मळकट रंगाची पावडर आढळून आली. पंचांसमक्ष चौकशी केली असता सदर पदार्थ एमडी क्रिस्टल पावडर असल्याचे आरोपीने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले. त्यानंतर सदर पदार्थाचे वजन करण्यात आले असता ते २०.७ ग्रॅम भरले. पोलिसांनी बाजारमूल्यानुसार प्रतिग्रॅम तीन हजार रुपये या दराने या अमली पदार्थाची किंमत ६२ हजार १०० रुपये असल्याचे सांगितले. संबंधित मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला.

एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा -
या प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७२७/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्यातील कलम ८(क) आणि २२(ब) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण बोरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संजय तुपे करीत आहेत. जप्त करण्यात आलेला अमली पदार्थ कुठून आणण्यात आला, त्याची विक्री कोणाला केली जात होती तसेच या व्यवहारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, या दिशेनेही तपास केला जात आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई -
पोलीस अधीक्षक गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशचंद्र शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईत पोलीस निरीक्षक प्रविण बोरकुटे, सहायक पोलीस निरीक्षक वैभव गेडाम, सहायक पोलीस निरीक्षक संजय तुपे यांच्यासह डी.बी. पथकातील सफौ कवलपालसिंग भाटीया, पोहवा सुदेश टेंभरे, निशिकांत लोंदासे, पोलीस शिपाई दिनेश बिसेन, सुभाष सोनवाने, अशोक रहांगडाले, कुणाल बारेवार, मुकेश रावते, प्रमोद शेंडे, सोनू नागपुरे, राकेश बंजारे आणि अजय बोपचे यांनी सहभाग घेतला.

शहरातील अमली पदार्थांच्या अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सुरू असलेल्या मोहिमेतील ही महत्त्वाची कारवाई मानली जात असून, या प्रकरणाच्या पुढील तपासात अमली पदार्थाच्या पुरवठा साखळीबाबत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.





  Print






Related Photos