राजुरा जिल्हा बँक शाखेत पहाटे भीषण आग : सुरक्षा यंत्रणेमुळे मोठी दुर्घटना टळली


- शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज , सेफ्टी ऑडिट आणि आधुनिक सुरक्षा उपाय ठरले प्रभावी घटनेनंतर काही तासांतच बँकेचे नियमित व्यवहार सुरळीत
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या राजुरा शाखेत सोमवारी ७ पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागल्याची घटना घडली. पहाटेच्या वेळी बँक बंद असताना आग लागल्याने परिसरात काही काळ खळबळ उडाली. मात्र, बँक प्रशासनाने पूर्वनियोजित केलेली सुरक्षा व्यवस्था तसेच वेळोवेळी करण्यात आलेल्या सेफ्टी ऑडिटमुळे आगीचा धोका वेळीच नियंत्रित करण्यात यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
राजुरा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेतून अचानक धूर निघत असल्याचे निदर्शनास येताच संबंधित यंत्रणा तातडीने सक्रिय झाली. शाखेत बसविण्यात आलेल्या तांत्रिक सुरक्षा यंत्रणांमुळे आगीची माहिती वेळेत मिळण्यास मदत झाली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यात आल्या.
अग्निशमन दल व पोलिस प्रशासनाची तत्परता -
घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन दलासह स्थानिक पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित यंत्रणांच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. सुरक्षा उपाययोजना आणि प्रशासनाची तत्परता यामुळे आग मोठ्या प्रमाणात पसरण्यापूर्वीच नियंत्रणात आणण्यात आली. आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचे स्वरूप याबाबत तांत्रिक तपासणी करण्यात आली. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
बँक प्रशासनाची तातडीने घटनास्थळी धाव -
घटनेची माहिती मिळताच बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर यांनी पहाटे चार वाजताच राजुरा शाखेला भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून आगीचे कारण, शाखेतील परिस्थिती आणि झालेल्या संभाव्य नुकसानीची माहिती घेतली. तसेच पुढील आवश्यक उपाययोजनांबाबत संबंधितांना सूचना केल्या. घटनेनंतर बँक प्रशासनाने शाखेतील आवश्यक पाहणी, स्वच्छता आणि तांत्रिक तपासणीचे काम तातडीने पूर्ण केले. बँकेच्या नियमित कामकाजावर परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष तत्परता दाखविली.
सकाळपासूनच बँकिंग व्यवहार सुरळीत -
आगीची घटना घडल्यानंतर आवश्यक ती खबरदारी घेत शाखेतील कामकाज पूर्ववत करण्यात आले. आज सकाळपासून राजुरा शाखेतील नियमित बँकिंग व्यवहार सुरळीतपणे सुरू झाले, त्यामुळे ग्राहकांच्या दैनंदिन व्यवहारांवर कोणताही मोठा परिणाम झाला नाही. जिल्हा बँक प्रशासनाने सर्व शाखांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सेफ्टी ऑडिट पूर्ण केले असून, तांत्रिक सुरक्षेसाठी आधुनिक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. राजुरा शाखेत घडलेल्या या घटनेत या सुरक्षा यंत्रणांचा प्रभावी उपयोग झाल्याने संभाव्य मोठी हानी टाळता आली, अशी माहिती बँक प्रशासनाकडून देण्यात आली.
पदाधिकाऱ्यांनी केली शाखेची पाहणी -
घटनेनंतर सकाळी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, राजुरा विभागीय कर्ज समितीचे अध्यक्ष उल्हास करपे, संचालक विजय बावणे तसेच संचालक आणि माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी राजुरा शाखेला भेट दिली. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची माहिती घेतली. आगीच्या घटनेनंतरही काही तासांतच शाखेचे नियमित कामकाज सुरू झाल्याने बँक प्रशासनाची तत्परता अधोरेखित झाली आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा यंत्रणांची नियमित तपासणी आणि तांत्रिक देखभाल अधिक प्रभावीपणे करण्यावर भर देण्याची गरज या घटनेमुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.




Petrol Price




