मृद व जलसंवर्धनासाठी आयोजित महा वॉकेथॉनमध्ये हजारोंचा सहभाग


- हिरवी झेंडी दाखवून महा वॉकेथॉनचा शुभारंभ
- प्रथम दहा विजेत्यांना रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : राज्याच्या जलसंधारणाचे प्रणेते माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा २१ ऑगस्ट हा जयंती दिन तसेच जलसंधारण दिनानिमित्त मृद व जलसंधारणाच्या जनजागृतीसाठी आयोजित महा वॉकेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकातून सुरू झालेल्या वॉकेथॉनला नागरिक, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित जलसंधारणाचा जागर केला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात सुरुवातीस मृद व जलसंवर्धणाची शपथ घेण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते हिरवी झेंडी दाखवून महा वॉकेथॉनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अरविंद उपरीकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा जलसंधारण अधिकारी आशिष गंधे, कृषि विज्ञान केंद्र सेलसुराचे वरीष्ठ शास्त्रज्ञ जीवन कतोरे, मृद व जलसंधारणचे उप अभियंता सुदेश ससाने, अक्षय बेंद्रे, निकिता देशमुख आदी उपस्थित होते.
शुभारंभानंतर वॉकेथॉन महात्मा गांधी चौक, शासकीय विश्रामगृह, नगर परिषद, कारागृह, पोष्ट ऑफिस समोरून मार्गक्रमण करत पुन्हा आंबेडकर चौकात येथे दाखल झाली व समारोप तसेच बक्षिस वितरणाचा कार्यक्रम झाला. महा वॉकेथॉन मध्ये सहभागी झालेल्या प्रथम १० सहभागार्थ्यांस मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना नगराध्यक्ष सुधीर पांगुळ म्हणाले, दिवसेंदिवस होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास व वृक्षतोडीमुळे विपरीत परिस्थिती निर्माण होत आहे. जमीनीतील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येकाने किमान एका वृक्षाचे रोपण करुन त्याचे जतन करणे आवश्यक आहे. सोबतच पावसाचा प्रत्येक थेंब जमीनीत मुरविणे ही काळाची गरज असल्याचे पांगुळ म्हणाले.
वॉकेथॉनमध्ये सहभागीतांनी हातात मृद व जलसंधारण संवर्धनाचे फलक घेतले होते. जनजागृतीपर घोषणा देत वॉकेथॉन पुढे जात असतांना वर्धाकरांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत होता. शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी घोष देत असतांना पाणी वाचवा, पाणी अडवाचा संदेश व जागर यावेळी होत होता.




Petrol Price




