अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी सिरोंचाचे एसडीपीओ जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा


- महसूल कर्मचारी संघटना तसेच अन्य संघटनांची पत्रकार परिषदेतून मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
रेती वाहतूक करणारे टक जप्त केल्याच्या प्रकरणात तहसील कार्यालयात येवून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना  अर्वाच्च व अश्लिल भाषेत शिवीगाळ केल्यामुळे सिरोंचा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना, विदर्भ पटवारी संघटना नागपूर, तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना, चतुर्थ श्रेणी महसूल कर्मचारी संघटना आदी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आज गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केली आहे.
पत्रकार परिषदेला नागपूर विभागीय अध्यक्ष राजु धांडे, संयुक्त समिती जिल्हाध्यक्ष चंदु प्रधान, विदर्भ पटवारी संघाचे जिल्हाध्यक्ष व्ही.आर. घागरगुंडे, तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष एस.के. वासनिक, विदर्भ पटवारी संघाचे सचिव ई.एस. चांदेकर, उपाध्यक्ष चंद्रशेखर बोकडे, सचिव विकास कुमरे, नवनाथ अतकरे, अमोल गव्हारे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १ नोव्हेंबर रोजी पहाटे महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी  रात्री १२ वाजतपासून केलेल्या कारवाईत मेडीगट्टा  प्रकल्पासाठी अवैध गौण खनीज वाहतूक करीत असताना एकूण १० डंपर जप्त केले होते. जप्त करण्यात आलेली वाहने सिरोंचा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव हे २ नोव्हेंबर रोजी दोन अज्ञात व्यक्तींसह तहसील कार्यालयात आले. तहसीलदार शासकीय दौऱ्यावर असताना उपस्थित असलेले तलाठी रवी मेश्राम आणि गजभिये यांना विचारणा केली. यावेळी त्यांनी कोणतीही खातरजमा न करता महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ केली. यामुळे सर्व महसूल कर्मचाऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. उपविभागीय पोलिस अधिकारी जाधव यांनी दिलगीरी व्यक्त केली. मात्र त्यांना कुठल्याही प्रकारचा पश्चाताप झाल्याचे दिसून आले नाही. यापुढे असे प्रकार होवू नये याकरीता त्यांच्यावर शिस्तभंगाची व निलंबनाची  कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलिस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.

कारवाई न केल्यास कामबंद आंदोलन करू

उपविभागीय पोलिस अधिकारी जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई न केल्यास उद्या १५ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनांनी दिला आहे. निलंबनासह विभागीय चौकशी करण्यात यावी, प्रशासनातील कारभार सुरळीत पार पाडावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

झालेल्या प्रकाराबाबत आपण दिलगिरी व्यक्त केली : एसडीपीओ जाधव

सिरोंचा येथील तहसीलदारांनी कारवाई केल्यानंतर आपणास रात्री २ वाजता संपर्क केला. यावेळी त्यांनी पोलिस पथकाची मागणी केली. आपण त्यांच्या मदतीसाठी एक पथक पाठविले. यानंतर आपण स्वतः तहसील कार्यालयात गेलो. यावेळी काही गैरसमज झाला.  झालेल्या प्रकरणाबाबत आपण दिलगीरी व्यक्त केली आहे. महसूल संघटनेने आपले संबंध रेती वाहतूकदारांशी असल्याचा आरोप केला. हा आरोप खोटा आहे. आपण कुणालाही ओळखत नाही. सर्व कार्यवाही कायदेशिर झालेली आहे, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी जाधव यांनी विदर्भ न्यूज एक्सप्रेसशी बोलताना दिली आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-14


Related Photos