बाजारपेठेतील वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर जीएसटीतून मिळणारे उत्पन्न एक लाख कोटी रुपयांवर


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  केंद्र सरकारने करचोरांवर ठेवलेला अंकुश आणि आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर ऑक्टोबरमध्ये वस्तू आणि सेवाकरातून (जीएसटी) मिळणारे उत्पन्न एक लाख कोटी रुपयांवर गेले आहे.
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये  ६७.४५ लाख व्यावसायिकांनी जीएसटी विवरणपत्रे दाखल केली. या महिन्यातील जीएसटीद्वारे मिळालेले एकूण उत्पन्न १लाख ७१० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सप्टेंबरमध्ये जीएसटीच्या माध्यमातून ९४,४४२ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले होते. 'ऑक्टोबरमध्ये जीएसटीच्या माध्यमातून एक लाख कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. करांचे दर कमी करून, करचोरी करणाऱ्यांना रोखून आणि कर अधिकाऱ्यांचा कमीत कमी हस्तक्षेप असूनही मोठ्या प्रमाणावर जीएसटी वसूल झाला आहे,' अशा आशयाचे ट्विट केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केले. अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एकूण जीएसटी उत्पन्नात काही राज्यांची कामगिरी अतिशय चांगली झाली आहे. 
ऑक्टोबरमध्ये जीएसटी उत्पन्नात केरळने ४४ टक्क्यांचे योगदान देऊन आघाडी मिळवली आहे. त्यापाठोपाठ झारखंड (२० टक्के), राजस्थान (१४ टक्के), उत्तराखंड (१३ टक्के) आणि महाराष्ट्र (११ टक्के) यांचा क्रमांक लागतो. यंदा एप्रिलमध्ये प्रथमच जीएसटीतून मिळणारे उत्पन्न एक लाख कोटी रुपयांचा टप्पा पार करून १,०३,४५८ कोटी रुपयांवर गेले होते. त्यानंतर सातत्याने मासिक जीएसटीचे उत्पन्न ९० हजार कोटी रुपयांहून अधिक नोंदवले गेले आहे. केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षात दरमहा एक लाख कोटी रुपयांच्या जीएसटी उत्पन्नाचे लक्ष्य निर्धारित केले आहे. 

   Print


News - World | Posted : 2018-11-02


Related Photos