गडचिरोली : दिभना जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार , परिसरातील सातवी घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा मुख्यालयापासून जवळच असलेल्या दिभना जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार झाल्याची घटना काल १८  मे रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. वंदना अरविंद जेंगठे (४०) रा. दिभना असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. 
प्राप्त माहितीनुसार, मृतक महिला भाजी म्हणून वापरले जाणारे जंगलातील कुड्याचे फूल गोळा करण्यास आपली मुलगी व अन्य ४ महिलांसोबत दिभना जंगलात दुपारी गेली होती. कुड्याचे फूल गोळा करताना दुपारी ४ वाजताच्या सुमारास वंदना यांच्यावर वाघाने अचानक हल्ला केला. परंतु सोबतच्या महिलांच्या सदर बाब लक्षात आली नाही. किंचित ओरडण्याचा आवाज आला. शहानिशा केल्यानंतर वाघाने वंदना यांच्यावर हल्ला केल्याचे महिलांच्या लक्षात आले. परंतु भीतीमुळे सर्व महिला गावाकडे परत आल्या व गावात सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर गावातील जवळपास १५ ते २० नागरिक घटनास्थळी गेले असता वंदना जेंगठे ही महिला मृतावस्थेत आढळून आली.
सदर घटनेची माहिती पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. पी. चांगले यांना देण्यात आली. त्यांनी सायंकाळी ६ वाजता जंगलात पोहोचून पंचनामा केला. गडचिरोली तालुक्यात येणाऱ्या या भागात आठवडाभरापूर्वी म्हणजे १० मे रोजी २ वेगवेगळ्या ठिकाणी २ महिलांना वाघाने ठार केले. एवढेच नाही तर गेल्या ७ महिन्यात ६ महिला आणि २ पुरुषांचा बळी वाघाने घेतला आहे. तरी वाघाला लवकरात लवकर जेरबंद करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत असून भितीेचे वातावरण पसरले आहे.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2021-05-19


Related Photos