महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूरचा  बल्ला आणि लंगडा राजुरा पोलिसांच्या जाळ्यात : वीज तार चोरीचे दोन गुन्हे उघड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : राजुरा पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने धडाकेबाज कारवाई करीत वीजवाहिन्यांवरील अ‍ॅल्युमिनियम तार चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले. या प्रकरणी बल्लारपूर येथील आरोपी रंजित ऊर्फ बल्ला शिवपुजन निषाद (२६ वर्षे) आणि मुन्ना ऊर्फ लंगडा संतोष रामकुपाल निषाद (३२ वर्षे) या दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण १ लाख ७८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

राजुरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जून २०२६ रोजी महावितरणचे कर्मचारी व्यंकटेश किष्टय्या नरमवार यांनी राजुरा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. के.व्ही. सास्ती फिडरवरील काही विद्युत खांब पडल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. ही विद्युत वाहिनी डब्ल्यूसीएलच्या चेक पोस्टच्या पुढील भागात असल्याने तेथील सुरक्षा कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली होती. मात्र, त्याच कालावधीत महावितरणचे कंत्राटदार संपावर असल्याने पडलेली विद्युत वाहिनी तातडीने दुरुस्त करता आली नाही.

या दरम्यान अज्ञात चोरट्याने बंद अवस्थेतील विद्युत वाहिनीवरील अ‍ॅल्युमिनियम तार चोरून नेली. यामध्ये १०० एसक्यू. एमएमची ३ हजार ४५० मीटर जुनी अ‍ॅल्युमिनियम तार, ५५ एसक्यू. एमएमची १ हजार ३५० मीटर जुनी अ‍ॅल्युमिनियम तार तसेच इतर साहित्य असा सुमारे १ लाख ९९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपी रंजित ऊर्फ बल्ला शिवपुजन निषाद, रा. सरदार पटेल वॉर्ड, बल्लारशाह आणि मुन्ना ऊर्फ लंगडा संतोष रामकुपाल निषाद, रा. भगतसिंग वॉर्ड, बल्लारशाह यांना ताब्यात घेतले. चौकशीत दोघांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

पोलिसांनी आरोपींकडून १ लाख ७२ हजार ३०० रुपये किमतीची अ‍ॅल्युमिनियम तार तसेच ६ हजार रुपये किमतीची ११५ फूट केबल तार, असा एकूण १ लाख ७८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे राजुरा पोलिसांनी वीज साहित्य चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले असून, आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन राजुरा येथे अप. क्र. ६६१/२०२६ व ५७७/२०२६, कलम ३०३(२) भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हे दाखल आहेत.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सपोनी लक्ष्मण लोकरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा विक्की निर्वाण, पोहवा अनुप डांगे, पो.अ. शफीक शेख, महेश बोलगोडवार, मिलिंद जांभुळे आणि रमेश बस्सी यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos