८०० वर्षांचा ऐतिहासिक गिरी गोसावी मठ नव्या रूपात : दीड कोटींच्या विकासकामांना वेग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : शहरातील मेंढा परिसरात वसलेला सुमारे ८०० वर्षांचा ऐतिहासिक गिरी गोसावी मठ व मंदिर समूह आता नव्या रूपात साकारत आहे. यादवकालीन व हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या वास्तूला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाल्यानंतर जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने विविध कामांना गती मिळाली आहे. सुमारे दीड कोटी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या विकासकामांमुळे भंडाऱ्याच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वैभवात नव्याने भर पडणार आहे.
मेंढा येथील गिरी गोसावी मठ परिसरात प्राचीन श्रीविष्णू, श्रीगणेश, विठ्ठल-रुक्मिणी यांच्यासह विविध देवतांची मंदिरे आहेत. याशिवाय अनेक गोसावी महंत, साधू आणि संन्याशांच्या समाध्याही येथे असून, या वास्तू तत्कालीन धार्मिक, सांस्कृतिक आणि स्थापत्य परंपरेची साक्ष देतात. मुख्य मंदिर यादवकालीन असून, समाधींवरील आकर्षक घुमट भोसलेकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना मानले जातात.
हेमाडपंथी स्थापत्याचा दुर्मीळ वारसा -
सुमारे आठ शतकांपूर्वी हेमाडपंथी स्थापत्यशैलीनुसार येथे चार मंदिरांचा समूह उभारण्यात आला. मंदिरांच्या देखभालीसाठी गिरी पंथातील गोसावी येथे वास्तव्यास आले आणि पुढे या परिसरात मठांची स्थापना झाली. तत्कालीन राजाने मंदिरांच्या देखभालीची जबाबदारी गिरी गोसाव्यांकडे सोपवत मेंढा परिसर त्यांना बहाल केल्याची ऐतिहासिक नोंदही उपलब्ध आहे.
धार्मिक परंपरेनुसार गिरी गोसावी हे शैवपंथीय होते. ते शस्त्रधारी संन्यासी म्हणून ओळखले जात. येथे आजही विविध महंत आणि साधू-संन्याशांच्या समाधी जतन करण्यात आल्या असून त्या इतिहासाची साक्ष देतात. अलोनी बाबा, मुब्रेगिरी महाराज, सूरजगिरी महाराज, गोविंद गिरी महाराज, शंकरगिरी महाराज यांसारख्या अनेक महंतांची स्मारके आणि मठ या परिसरात आहेत. सातव्या पिढीपासून या मठात महिलांनाही प्रवेश मिळाल्याची परंपरा सांगितली जाते.
आद्य शंकराचार्यांच्या परंपरेशी संबंध -
गिरी गोसावी परंपरेचा संबंध आद्य शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या दशनाम संप्रदायाशी जोडला जातो. शंकराचार्यांनी धर्मप्रसारासाठी गिरी, पुरी, भारती, वन, अरण्य, पर्वत, सागर, तीर्थ, आश्रम आणि सरस्वती अशा दशनाम परंपरेचा विस्तार केला. गोस्वामी म्हणजे इंद्रियांवर नियंत्रण मिळविणारा व्यक्ती, असा या शब्दाचा अर्थ मानला जातो. कालांतराने याच शब्दाचा अपभ्रंश होऊन गोसावी, गोसाई आणि गुसाई अशी नावे प्रचलित झाली.
उपेक्षेतून संवर्धनाकडे प्रवास -
काही वर्षांपूर्वीपर्यंत हा संपूर्ण परिसर झाडाझुडपांनी वेढलेला, कचऱ्याने भरलेला आणि अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत होता. स्थानिक समितीने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर शासनाने या वास्तूला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा प्रदान केला. त्यानंतर पुरातत्त्व विभागाने संरक्षक भिंत, दगडी फरसबंदी (फ्लोरिंग) आणि अन्य संरक्षणात्मक कामांसाठी सुमारे ७३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. ही कामे पूर्णत्वाच्या मार्गावर असून परिसराचे रूप पालटू लागले आहे.
याशिवाय पर्यटन विकासाच्या दृष्टीने सुमारे दीड कोटी रुपयांच्या निधीतून सुशोभीकरण, मूलभूत सुविधा, परिसर विकास आणि वारसा संवर्धनाची कामे सुरू आहेत. या उपक्रमांमुळे गिरी गोसावी मठाचे ऐतिहासिक वैभव जपले जाणार असून पर्यटकांसाठी आकर्षक वारसा स्थळ म्हणून त्याची नवी ओळख निर्माण होणार आहे.
पर्यटनाच्या नकाशावर भंडाऱ्याला नवी ओळख -
गिरी गोसावी मठाच्या संवर्धनामुळे भंडारा जिल्ह्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. वारसा वास्तूचे जतन आणि आधुनिक सुविधांचा समन्वय साधत हे स्थळ भविष्यात विदर्भातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
गिरी गोसावी मठाच्या पुढील टप्प्यात जतन, जीर्णोद्धार आणि सौंदर्यीकरणाची आणखी कामे प्रस्तावित आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर भंडारा आणि परिसरातील हे एक प्रमुख पर्यटन आकर्षण ठरेल, यात दुमत नाही, असा विश्वास संबंधितांकडून व्यक्त करण्यात आला.
News - Bhandara




Petrol Price




