महत्वाच्या बातम्या

 बेकायदा सावकारीच्या जाळ्यावर ब्रम्हपुरी पोलिसांचा प्रहार : गुन्हा दाखल, ११ नोंदवह्या व कोरे धनादेश जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रम्हपुरी शहरात बेकायदा सावकारीच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक पिळवणूक करणाऱ्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक निबंधक, सहकारी संस्था कार्यालयाच्या चौकशीनंतर आणि घरझडतीत व्याजाच्या व्यवहारांच्या नोंदी असलेल्या ११ नोंदवह्या, दैनंदिन वसुलीचे पासबुक तसेच सहा स्वाक्षरी केलेले कोरे धनादेश जप्त करण्यात आले आहेत.

या प्रकरणी अमरसिंग लक्ष्मणसिंग टाक ५८ वर्ष रा. गुरुद्वाराजवळ, फुलेनगर, ब्रम्हपुरी याच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत ब्रम्हपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सहायक निबंधक, सहकारी संस्था, ब्रम्हपुरी येथील स्वप्नील बाळासाहेब पाटील यांनी केलेल्या चौकशीत दोन तक्रारदारांनी गंभीर आरोप केले होते. व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जावर अवाजवी व्याज आकारून मोठ्या प्रमाणात वसुली करण्यात येत असल्याचे, तसेच मोठी रक्कम परतफेड करूनही आणखी पैशांची मागणी करत शिवीगाळ, धमक्या आणि मानसिक छळ केला जात असल्याचे तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले होते.

या तक्रारींची पडताळणी केल्यानंतर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमाच्या कलम १६ अन्वये झडतीची कारवाई करण्यात आली. १४ जुलै २०२६ रोजी सहायक निबंधक कार्यालयाच्या पथकाने पंच व पोलिसांच्या उपस्थितीत अमरसिंग टाक यांच्या निवासस्थानी झडती घेतली.

झडतीदरम्यान व्याजाने पैसे दिल्याच्या नोंदी असलेल्या ११ नोंदवह्या, कर्जदारांकडून दैनंदिन वसुलीची नोंद असलेले एक पासबुक, एक कोरे पासबुक, तसेच रक्कम व दिनांक नमूद नसलेले सहा स्वाक्षरीयुक्त धनादेश जप्त करण्यात आले. सर्व कागदपत्रांचा पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला.

जप्त करण्यात आलेल्या दस्तऐवजांच्या आधारे संबंधित व्यक्ती वैध अनुज्ञप्तीशिवाय सावकारी व्यवसाय करत असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४ चे कलम ३९ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मनोज खडसे करीत आहेत. या कारवाईमुळे परिसरातील बेकायदा सावकारीच्या जाळ्यावर मोठा आघात झाल्याचे मानले जात असून, जप्त कागदपत्रांच्या आधारे आणखी आर्थिक व्यवहार आणि संभाव्य पीडितांची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos