लाखनी उड्डाणपुलावर उभ्या ट्रकला भरधाव ट्रकची धडक : सहप्रवाशाचा मृत्यू

- इंडिकेटर न देता रस्त्याच्या मध्यभागी ट्रक उभा केल्याचा आरोप,चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/ भंडारा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील लाखनी उड्डाणपुलावर रस्त्याच्या मध्यभागी उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या मालवाहू ट्रकची जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात एका सहप्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. वाहतूककोंडीच्या वेळी कोणतीही सुरक्षा व्यवस्था न करता ट्रक उभा केल्याने हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून लाखनी पोलिसांनी संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मृताचे नाव शफाकत खान आमद खान ५८ वर्ष रा. अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहम्मद इस्माईल मोहम्मद इब्राहिम (रा. मन्सुरी मस्जिदजवळ, काझीपुरा, अंजनगाव सुर्जी) हे त्यांच्या ताब्यातील ट्रक (क्र. एमएच-३० बीडी-७५८६) मधून अंजनगाव सुर्जी येथून संबलपूर (ओडिशा) येथे माल घेऊन जात होते. लाखनी उड्डाणपुलावर पोहोचल्यावर त्यांच्या समोर ट्रक क्रमांक एमएच-४२ एआर-५१९९ रस्त्याच्या मध्यभागी उभा असल्याचे दिसून आले.
आरोपानुसार, संबंधित ट्रक चालकाने वाहन उभे करण्यापूर्वी कोणताही इंडिकेटर सुरू केला नव्हता किंवा इतर वाहनांना सावध करण्यासाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था केली नव्हती. त्यामुळे अचानक समोर उभा असलेला ट्रक दिसल्याने मागील ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि त्याच्या ट्रकने समोरील ट्रकला मागून जोरदार धडक दिली.
अपघाताच्या वेळी उड्डाणपुलावर वाहतूककोंडी असल्याने वाहने संथगतीने सुरू होती. मात्र, निष्काळजीपणामुळे हा अपघात टाळता आला नाही. धडक इतकी भीषण होती की ट्रकमध्ये बसलेले शफाकत खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.
त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय, लाखनी येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी पोलिसांनी वैद्यकीय अहवाल व इतर पुराव्यांच्या आधारे गुन्हा क्रमांक ३८०/२०२६ नोंदविला आहे. भारतीय न्यायसंहिता कलम १२५ (ब), १०६ (१) तसेच मोटार वाहन कायद्यानुसार संबंधित ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस हवालदार बोरकर करीत आहेत.
उड्डाणपुलावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर -
लाखनी उड्डाणपुलावर वारंवार अपघात होत असल्याने वाहनचालक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पुलावरील काही तांत्रिक त्रुटी अद्याप कायम असल्याची तक्रार असून वाहतूककोंडीच्या वेळी बिघाड झालेली किंवा थांबवलेली वाहने योग्य इशारा न देता उभी केली जात असल्याने अपघाताचा धोका वाढत आहे. त्यामुळे महामार्ग प्रशासनाने पुलावरील सुरक्षा उपाय अधिक कडक करावेत, वाहतूक नियंत्रणासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करावी आणि बिघाड झालेल्या वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.
News - Bhandara




Petrol Price




