पूरात अडकलेल्या ट्रकचालकांना खालसा फाउंडेशन व निर्भय ट्रान्सपोर्टचा मदतीचा हात : मसाला भात व पाण्याचे वाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे बल्लारपूरमार्गे तेलंगणाकडे जाणारा मुख्य मार्ग ३१ जुलैच्या सायंकाळपासून वाहतुकीसाठी बंद झाल्याने शेकडो मालवाहू ट्रक महामार्गावर अडकून पडले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ट्रकच्या लांबच लांब रांगा लागल्याने चालक व वाहकांना अनेक तास जागेवरच थांबावे लागले.
या काळात अनेकांना पिण्याचे पाणी व जेवणाचीही गैरसोय निर्माण झाली होती.
या परिस्थितीची दखल घेत खालसा फाउंडेशन, बल्लारपूर आणि निर्भय ट्रान्सपोर्ट यांनी सामाजिक बांधिलकी जपत पुढाकार घेत अडकलेल्या ट्रकचालक व वाहकांना मसाला भात आणि पिण्याच्या पाण्याचे वितरण केले. या उपक्रमामुळे अनेक चालकांना मोठा दिलासा मिळाला.
खालसा फाउंडेशनचे अध्यक्ष तेजिंदर सिंग दारी आणि निर्भय ट्रान्सपोर्टचे सतविंदर सिंग दारी यांच्या नेतृत्वाखाली हा सेवा उपक्रम राबविण्यात आला. पुरामुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीत चालक-वाहकांना वेळेवर अन्न व पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श ठरलेल्या या उपक्रमाचे वाहनचालकांनी मनापासून स्वागत करत आयोजकांचे आभार मानले.
या अन्न व पाणी वितरण उपक्रमात नरिंदर सिंग दारी, गुरमंत सिंग, मनविंदर सिंग, अमित सिवरायन, दिलीप फुलझेले, संतोष मडावी, मंगेश, अजित सिंह तसेच बामणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्वांनी मिळून ट्रकच्या रांगांमध्ये जाऊन चालक व वाहकांना मसाला भात आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वितरण केले.
पूरग्रस्त परिस्थितीत अडकलेल्या वाहनचालकांना वेळेवर मदत करून खालसा फाउंडेशन आणि निर्भय ट्रान्सपोर्ट यांनी सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. हा उपक्रम संकटाच्या काळात मानवतेचा संदेश देणारा ठरला.
News - Chandrapur




Petrol Price




