महत्वाच्या बातम्या

 पोलिस ठाण्यातून आरोपी पहाटे पळाला : सायंकाळी गुन्हे शाखेकडून जेरबंद


- ११ गुन्हे दाखल बारावा गुन्हा नोंदविताना ठोकली धूम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : गिट्टीखदान पोलिस ठाण्यातून पहाटेच्या सुमारास पोलिसांच्या ताब्यातून पसार झालेला कुख्यात गुन्हेगार अखेर शनिवारी सायंकाळी गुन्हे शाखेच्या पथकाने आनंद टॉकीज परिसरातून जेरबंद केला.

या घटनेमुळे दिवसभर पोलिस यंत्रणेत एकच खळबळ उडाली होती. आरोपीचा शोध घेण्यासाठी शहरभर नाकाबंदी करण्यात आली होती, तर गुन्हे शाखेसह विविध पथके त्याच्या मागावर होती.

अखेर सायंकाळी त्याला पुन्हा अटक करण्यात आल्याने पोलिसांनी सुटकेचा निःश्वास सोडला. आशिष विल्सन उर्फ मेंटल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध गिट्टीखदान पोलिस ठाण्यात २०१५ पासून आतापर्यंत एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. शुक्रवारी रात्री पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. त्याच्याविरुद्ध शस्त्रविरोधी कायद्यानुसार बारावा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना शनिवारी पहाटे सुमारे ३.३० वाजता त्याने पोलिस ठाण्यातून धूम ठोकली.

आरोपी पसार झाल्याचे लक्षात येताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर गुन्हे शाखेसह विविध पोलिस पथके सक्रिय झाली. दिवसभर शहरातील विविध भागांत शोधमोहीम राबविण्यात आली.

अखेर सायंकाळी आनंद टॉकीज परिसरात सापळा रचून गुन्हे शाखेच्या पथकाने आशिष विल्सन उर्फ मेंटल याला पुन्हा ताब्यात घेतले.दरम्यान, पोलिस ठाण्यातून आरोपी पसार होण्याची आठवडाभरातील ही दुसरी घटना ठरली आहे.

काही दिवसांपूर्वी हुडकेश्वर पोलिस ठाण्यातून एक्का नावाचा कुख्यात गुन्हेगारही पोलिसांच्या ताब्यातून

पळून गेला होता. त्याला नंतर गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे अटक करण्यात आली होती.

सलग दुसऱ्यांदा घडलेल्या या प्रकारामुळे पोलिस ठाण्यांतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले

असून, संबंधित कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणाबाबत वरिष्ठ अधिकारी नाराज असल्याची माहिती आहे.

या सलग घडलेल्या घटनांमुळे पोलिस ठाण्यांतील सुरक्षा,आरोपींवर ठेवण्यात येणारी देखरेख आणि बंदोबस्ताच्या पद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, अशा प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.


.






  Print






News - Nagpur




Related Photos