महत्वाच्या बातम्या

 पवनार येथे धाम नदीतील गायमुख कुंडात युवक बुडाला : शोधकार्य सुरू, परिसरात चिंतेचे वातावरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : पवनार येथील धाम नदीवरील गांधीस्तंभ परिसरात शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी घटनेत ३५ वर्षीय युवकाचा पाय घसरून नदीतील खोल गायमुख कुंडात पडल्याने बुडाल्याची घटना घडली. वृत्त लिहीपर्यंत संबंधित युवकाचा शोध लागला नसून पोलिस, स्थानिक नागरिक आणि जलतरणपटू यांच्या मदतीने युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू होती. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

बुडालेल्या युवकाचे नाव प्रशांत प्रभाकर माणूसमारे ३५ वर्षे रा. जऊळ, ह.मु. बोरगाव मेघे असे आहे. घटनावेळी त्याच्यासोबत त्याचा मित्र गणेश अनिल सुरवसे  ३२ वर्षे उपस्थित होता.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत आणि त्याचा मित्र गांधीस्तंभ परिसरातील रस्त्याने जात असताना अचानक प्रशांतचा तोल गेला. रस्ता निसरडा असल्याने तो थेट धाम नदीतील खोल गायमुख कुंडात कोसळला. कुंडातील पाण्याची खोली आणि प्रवाह अधिक असल्यामुळे तो काही क्षणांतच पाण्याखाली गेला आणि बेपत्ता झाला.

घटनेची माहिती मिळताच सेवाग्राम पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील पाऊलझाडे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही. एम. दूधकोवळे तसेच समादेशक गणेश हिवरे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ शोधमोहीम सुरू केली.

दरम्यान, पवनार येथील धाडसी जलतरणपटू अर्जुन सातघरे यांनी धाम नदीत उतरून युवकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, वृत्त लिहीपर्यंत युवकाचा कोणताही ठावठिकाणा लागला नव्हता. सायंकाळनंतर अंधार वाढल्याने शोधकार्यात अडथळे निर्माण होत असून प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच गांधीस्तंभ परिसरात नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त ठेवत बघ्यांना सुरक्षित अंतरावर ठेवण्याचे आवाहन केले.

या दुर्घटनेनंतर धाम नदीतील खोल कुंडे, निसरडे काठ आणि अपुऱ्या सुरक्षा उपाययोजनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गांधीस्तंभ परिसरात संरक्षक कठडे, धोक्याचे इशारा फलक आणि आवश्यक सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे, जेणेकरून भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये.





  Print






News - Wardha




Related Photos