महत्वाच्या बातम्या

 शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कृषीपायाभूत सुविधा निधी योजनेचा लाभ घ्या : जिल्हाधिकारी वान्मथी सी


- कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : शेतकरी उत्पादक कंपन्यांनी स्थानिक पातळीवरील फळे, भाजीपाला, तूर, चणा आणि गहू यांसारख्या पिकांवर आधारित उद्योग उभारणीसाठी पुढाकार घ्यावा. शेतमालाचे मूल्यवर्धन, साठवणूक, प्रक्रिया, वाहतूक आणि विपणन क्षेत्रात तरुणांनी सक्रिय सहभाग नोंदवावा. जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले.

आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा आत्माचे प्रकल्प संचालक अरविंद उपरीकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक सुशांत पाटील, अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक वैभव लहाने, आत्माचे प्रकल्प उपसंचालक राणी गायकवाड, वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव समीर पेंडके, सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती केसरीचंद बालाराम खंगारे, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव तुकाराम चांभारे, कृषि उपसंचालक शेखर कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कार्यशाळेच्या प्रारंभी प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रस्ताविकातून अरविंद उपरीकर यांनी कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेची उद्दिष्टे, पात्रता निकष, सात वर्षांची कालमर्यादा तसेच दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याज सवलत आणि क्रेडिट गॅरंटी याबाबत माहिती दिली. तसेच पीएमएफएमई, मुख्यमंत्री कृषी व अन्नप्रक्रिया योजना आणि पोकरा यांसारख्या विविध योजनांची सांगड घालून शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक सुशांत पाटील यांनी योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, प्रकल्पांची माहिती आणि आवश्यक कागदपत्रांविषयी माहिती दिली. अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक वैभव लहाने यांनी बँकांमार्फत मिळणाऱ्या कर्जसुविधा व तांत्रिक बाबींवर मार्गदर्शन केले.

कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगणघाटचे सचिव तुकाराम चांभारे यांनी शेतमाल विक्रीमध्ये बाजार समित्यांची भूमिका स्पष्ट करत विविध योजनांची माहिती दिली. कृषी उत्पन्न बाजार समिती, वर्धाचे सचिव समीर पेंडके यांनी ई-नाम शेतमाल विक्री प्रक्रियेविषयी माहिती देत शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी उपलब्ध असलेल्या बाजारपेठेतील संधींची माहिती दिली.

आत्माच्या प्रकल्प उपसंचालक राणी गायकवाड यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांनी आपले अनुभव उपस्थितांसमोर मांडले.

कार्यशाळेच्या शेवटी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विविध शंकांचे निरसन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राणी गायकवाड यांनी केले. या कार्यशाळेत शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गट, महिला बचत गट, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos