चिकन व्यवसायातील स्पर्धा रक्तरंजित : युवकावर जीवघेणा हल्ला, दोघांना अटक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे चिकन व्यवसायाच्या वादातून एका युवकावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सावली पोलिसांनी आरोपी बाप-लेकाला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रोशन कालिदास नागापुरे हा व्याहाड खुर्द येथे स्वतःचा चिकन विक्रीचा व्यवसाय करतो. गुरुवारी रात्री तो आपल्या नातेवाईकासह गावातील एका पानठेल्यावर उभा असताना दानीष हमीद कुरेशी यांनी त्याच्या वाद केला. क्षुल्लक कारणावरून सुरू झालेला हा वाद काही क्षणांतच हाणामारीत परिवर्तित झाला.
आरोप आहे की, दानीष कुरेशी याने रोशनला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या हमीद कुरेशी यांनी हातातील काठीने रोशनच्या डोक्यावर जोरदार वार केला. या हल्ल्यात रोशन गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळला. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी जखमी रोशनला तातडीने वाहनातून गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात नेले. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून नागपूर येथील मेडिकल कॉलेज मध्ये उपचार सुरू आहे.
रोशन नागापुरे याने पूर्वी हमीद कुरेशी यांच्या चिकन दुकानात काम केले होते. काही काळानंतर त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. याच कारणावरून निर्माण झालेल्या वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी कालिदास मारोती नागापुरे यांच्या फिर्यादीवरून सावली पोलिसांनी हमीद कुरेशी व दानीष हमीद कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सावली पोलीस करीत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




