कोरपन्यात कापड दुकानाला भीषण आग : शॉर्टसर्किटमुळे लाखाचे नुकसान

- राजलक्ष्मी गारमेंट्समधील कापड व साहित्य जळून खाक : नागरिकांच्या सतर्कतेने आग आटोक्यात
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी /चंद्रपूर : येथील मुख्य मार्गावर असलेल्या राजलक्ष्मी गारमेंट्स या कापड दुकानाला शॉर्टसर्किटमुळे गुरुवारी ३० दुपारी ३ वाजताच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत दुकानातील मोठ्या प्रमाणातील कापड, कपडे आणि अन्य साहित्य जळून खाक झाले असून, सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज दुकानमालकाने व्यक्त केला आहे.
राजलक्ष्मी गारमेंट्स हे दुकान पांडुरंग वरभे यांच्या मालकीचे आहे. गुरुवारी दुपारी दुकानातून अचानक धुराचे लोट बाहेर येत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच दुकानमालक आणि नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
आगीने उग्र रूप धारण करण्यापूर्वीच दुकानमालक आणि नागरिकांनी पाण्याच्या सहाय्याने आग विझविण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे आग नियंत्रणात आणण्यात यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
या आगीत दुकानातील कापड, तयार कपडे तसेच इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर नुकसानीचा पंचनामा करण्यात येणार असून, पुढील तपास केला जात आहे.
News - Chandrapur




Petrol Price




