गुरुपौर्णिमेनिमित्त पंचायत समिती बल्लारपूरमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा प्रतिमा अनावरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त पंचायत समिती बल्लारपूर परिसरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांच्या अनावरणाचा भव्य सोहळा २९ जुलै रोजी आयोजित करण्यात आला आहे. पंचायत समितीतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वयंस्फूर्त वर्गणीतून हा उपक्रम साकारण्यात आला असून, संतांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि जनसेवेसाठी प्रेरणा घेण्याचा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे.
समाजप्रबोधन, ग्रामविकास, स्वच्छता, मानवता, राष्ट्रसेवा आणि निःस्वार्थ समाजकार्यासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या या दोन महान संतांच्या कार्याची प्रेरणा अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळावी, तसेच समाजहिताच्या कार्यात अधिक समर्पित भावनेने योगदान देता यावे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे पंचायत समिती प्रशासनाने सांगितले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामविकास, राष्ट्रनिर्माण, नैतिक मूल्ये आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला, तर कर्मयोगी संत गाडगेबाबांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, शिक्षण आणि सामाजिक समतेचा विचार कृतीतून समाजासमोर मांडला. त्यांच्या विचारांचे स्मरण करून समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) नूतन सावंत, उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा, तहसीलदार रेणुका कोकाटे, सहाय्यक लेखाधिकारी भेजेंद्र मसराम, विस्तार अधिकारी (पंचायत) दिलीप बैलंवार यांच्यासह विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते संतांच्या प्रतिमांचे अनावरण होणार आहे.
याचवेळी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार असून, पंचायत समितीतील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सामूहिक शिवगर्जना व शिवआरती सादर केली जाणार आहे. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून भजन संध्याचेही आयोजन करण्यात आले असून, संतविचारांचा जागर भक्तिमय वातावरणात होणार आहे.
कार्यक्रमात शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकास, उमेद अभियान, पशुसंवर्धन, कृषी, बांधकाम, पंचायत तसेच इतर विभागांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांतील एकात्मता, सामाजिक बांधिलकी आणि संतांविषयीची श्रद्धा अधोरेखित करणारा हा सोहळा प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
पंचायत समिती बल्लारपूरचे गट विकास अधिकारी धनंजय साळवे यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी व मान्यवरांनी उपस्थित राहून गुरुपौर्णिमेच्या या प्रेरणादायी सोहळ्याला यशस्वी करावे, असे आवाहन केले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




