रु. २० हजारांच्या लाचप्रकरणी भद्रावतीतील वनपाल, वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : भद्रावती वनक्षेत्र सहायक कार्यालयातील वनपाल कोमल नरसिंगराव घुगलोत, वनरक्षक संदीप पुंडलिक पारवे आणि खाजगी इसम ललीत दिलीप नागपूरे यांना अवैध रेती वाहतूक प्रकरणातील कारवाईची कागदपत्रे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याच्या आरोपावरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज, २७ जुलै रोजी सापळा रचून ताब्यात घेतले. या कारवाईमुळे वन विभागात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ७ जुलै २०२६ रोजी रात्री तक्रारदार स्वतःच्या घराच्या बांधकामासाठी ट्रॅक्टर-ट्रॉलीने रेतीची वाहतूक करीत असताना वनपाल कोमल घुगलोत आणि वनरक्षक संदीप पारवे यांनी त्यांचे वाहन अडवून वनक्षेत्र सहायक कार्यालय, भद्रावती येथे नेले. त्यानंतर संबंधित कारवाईची कागदपत्रे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे पाठविण्यासाठी २० हजार रुपये लाच मागण्यात आले.
लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने २३ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर २७ जुलै रोजी एसीबीने सापळा रचला. कारवाईदरम्यान आरोपींनी ललीत दिलीप नागपूरे यांच्या मार्फत २० हजार रुपये लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा एसीबीने केला आहे. त्यानंतर तिन्ही आरोपींना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली.
सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चे पोलीस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलीस अधीक्षक माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अनिल जिट्टावार, पोलीस निरीक्षक प्रशांत केदार तसेच पोलीस हवालदार हिवराज नेवारे, रविकांत इंगळे, पोलीस शिपाई अमोल सिडाम, राकेश जांभुळकर, प्रदीप ताडाम, सचिन गजभिये, महेश माहुरपवार, महिला पोलीस शिपाई मेघा मोहुर्ले, चालक पोलीस शिपाई सतीश सिडाम आणि वाहनचालक पोलीस शिपाई संदीप कौरासे यांच्या पथकाने केले.
News - Chandrapur




Petrol Price




