कारगिल विजय दिनानिमित्त सन्मित्र सैनिकी विद्यालयात देशभक्तीचा जागर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : कारगिल युद्धातील शूरवीर जवानांच्या पराक्रमाची प्रेरणा छात्रसैनिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सन्मित्र सैनिकी विद्यालय, चंद्रपूर येथे कारगिल विजय दिन उत्साहपूर्ण व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात कारगिल युद्धातील शहीद जवानांना अभिवादन करून त्यांच्या बलिदानाचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वीर जवानांच्या प्रतिमेला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या अरुंधती कावडकर, प्रमुख अतिथी लेफ्टनंट कर्नल रुबी दीक्षित तसेच भारतीय सैन्यात दोन पुत्र, एक कन्या आणि कारगिल युद्धात सहभागी झालेले पती अशी गौरवशाली परंपरा लाभलेल्या एका वीरमातेचा विशेष सन्मान करण्यात आला.
विद्यालयाच्या छात्रसैनिकांनी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शहीदांना मानवंदना दिल्यानंतर दीपप्रज्ज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. रोशनी तडवी यांनी प्रास्ताविकासह सूत्रसंचालन केले. प्रमुख अतिथी लेफ्टनंट कर्नल रुबी दीक्षित यांचा शाल, श्रीफळ, पुस्तक आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात वेदांत तावाडे व फाल्गुन बावणे यांनी कारगिल युद्धाचा इतिहास आणि भारतीय सैन्याच्या शौर्याची माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली. मयंक कलिहारी व वेदांत बन्सपाल यांनी भारताची शेजारी राष्ट्रे आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर पॉवरपॉइंट सादरीकरण करून विद्यार्थ्यांमध्ये संरक्षणविषयक जागरूकता निर्माण केली. साहिल उरकुडे याने देशभक्तीपर गीत सादर करून वातावरण भारावून टाकले.
मार्गदर्शन करताना लेफ्टनंट कर्नल रुबी दीक्षित यांनी स्वयंशिस्त, ध्येयाप्रती निष्ठा आणि जबाबदारीची जाणीव ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले. प्राचार्या अरुंधती कावडकर यांनी विद्यार्थ्यांनी मातृभूमीप्रती समर्पणाची भावना जोपासून राष्ट्रसेवेसाठी सदैव सज्ज राहावे, असे आवाहन केले. कल्याणमंत्र आणि शांतिमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली.
News - Chandrapur




Petrol Price




