महत्वाच्या बातम्या

 रानटी हत्तींचा कळप मंजेवाडा परिसरात : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / आरमोरी : गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात रानटी हत्तींच्या कळपाचा पुन्हा वावर वाढला असून सध्या हा कळप पळसगाव उपक्षेत्रातील मंजेवाडा परिसरात दाखल झाला आहे. मागील पाच ते सहा दिवसांपासून हा कळप सालमारा परिसरात मुक्कामी होता. शनिवारी रात्री हत्तींच्या कळपाने मंजेवाडा जंगलात प्रवेश केल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हत्तींचा कळप जंगलालगतच्या भागात फिरत असल्याने शेतपिकांचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शेतकरी सतर्क झाले असून रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळत आहेत. वनविभागानेही परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

विशेषतः मंजेवाडा व परिसरातील गावांतील नागरिकांनी रात्रीच्या वेळी जंगल परिसरात जाणे टाळावे, तसेच हत्तींचा कळप आढळल्यास त्यांना कोणत्याही प्रकारे हुसकावून लावण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

हत्तींच्या हालचालींवर वनविभागाचे पथक सातत्याने लक्ष ठेवून असून परिस्थितीनुसार पुढील उपाययोजना केल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos