महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीतील कारगिल चौकात २७ वा कारगिल विजय दिवस देशभक्तीच्या उत्साहात साजरा


- वीरमाता, वीरपत्नी, वीरपरिवार व माजी सैनिकांचा सन्मान; शहीद जवानांच्या शौर्याला मानवंदना

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : कारगिल युद्धातील भारतीय जवानांच्या अतुलनीय शौर्य, पराक्रम आणि बलिदानाच्या स्मृती जागवत गडचिरोली शहरातील बाजार चौक परिसरातील कारगिल चौक येथे २७ वा कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना जिल्हा गडचिरोली, आजी-माजी सैनिक संघटना आणि कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात शहीद जवानांना भावपूर्ण मानवंदना अर्पण करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात गांधी चौक ते कारगिल चौक दरम्यान काढण्यात आलेल्या भव्य कारगिल विजय दिन रॅलीने झाली. तिरंगा हाती घेत देशभक्तीपर घोषणा देत नागरिक, विद्यार्थी आणि माजी सैनिकांनी रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. त्यानंतर कारगिल स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून १९९९ च्या कारगिल युद्धात मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन आणि कवायतीचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. देशभक्तीची भावना जागृत करणाऱ्या या सादरीकरणाचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. सहभागी विद्यार्थ्यांना आयोजकांच्या वतीने नोटबुकांचे वाटप करून त्यांचा गौरव करण्यात आला.

वीरपरिवारांचा सन्मान -
कार्यक्रमात देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहीद जवानांच्या वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, सैनिकांच्या कुटुंबीयांसह विविध पुरस्कारप्राप्त माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी उभे राहून त्यांच्या त्यागाला सलाम करत कृतज्ञता व्यक्त केली.

सैनिकांचे बलिदान देशासाठी प्रेरणादायी – डॉ. अशोकजी नेते -
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी खासदार तथा भाजप अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी कारगिल युद्धातील वीर जवानांच्या शौर्याची आठवण करून देत त्यांना अभिवादन केले.

ते म्हणाले, कारगिलच्या उंच पर्वतरांगांमध्ये उणे २० अंश सेल्सिअस तापमानातील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत भारतीय जवानांनी अद्वितीय शौर्य गाजवत शत्रूचा पराभव केला आणि कारगिलच्या शिखरांवर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला. त्यांच्या त्यागामुळेच आपण आज सुरक्षित आणि स्वतंत्र भारतात जगत आहोत. सैनिक हे राष्ट्राचे खरे आधारस्तंभ आहेत. निवृत्तीनंतरही माजी सैनिक समाजसेवेच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मितीत मोलाचे योगदान देत असतात. शहीद जवानांचे बलिदान आणि त्यांच्या कुटुंबीयांचा त्याग हा संपूर्ण देशासाठी सदैव प्रेरणादायी आणि वंदनीय राहील.

यावेळी त्यांनी भारत-बांगलादेश सीमेवर कर्तव्य बजावताना वीरमरण आलेले गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील मरारटोला येथील जवान सुरेश आंबाडर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच भारत मातेच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या सर्व वीर जवानांच्या शौर्याला शतशः नमन करून त्यांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

मान्यवरांची उपस्थिती -
या कार्यक्रमाला माजी खासदार डॉ. अशोकजी नेते, गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे, नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रणोती सागर निंबोरकर, लॉयड्स मेटल्स अँड एनर्जीचे प्रतिनिधी कर्नल रामनाथ स्वामी, माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका योगिता पिपरे, कारगिल स्मारक समितीचे संस्थापक उदय धकाते, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष होमराज डोनाळकर, कारगिल समितीचे अध्यक्ष ऋषीजी वंजारी, वीरपत्नी सुधा चंदनखेडे, आरमोरी येथील चंदा राऊत, घिसुलाल काबरा, चंद्रशेखर भंडागे यांच्यासह आजी-माजी सैनिक, वीरपरिवार, लोकप्रतिनिधी आणि देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आयोजक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत तसेच वंदे मातरम्, भारत माता की जय आणि भारतीय सैन्य दल झिंदाबाद या घोषणांनी कार्यक्रमाची सांगता झाली. संपूर्ण कारगिल चौक परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला आणि उपस्थितांनी शहीद जवानांच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos