महत्वाच्या बातम्या

 राजुरा येथे युवक काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक : नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : युवक काँग्रेसचे संघटन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने राजुरा येथील रामनगर परिसरातील समाज भवन येथे युवक काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. बैठकीत संघटन विस्तार, सदस्य नोंदणी, आगामी कार्यक्रमांचे नियोजन तसेच युवकांच्या सहभागातून पक्ष बळकट करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी युवक काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

राजुरा विधानसभा काँग्रेसचे समन्वयक तथा नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे संघटनात्मक संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवत युवकांनी पक्षाची विचारधारा सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सक्रिय राहण्याचे आवाहन केले. राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष उमेश गोनलवार यांनी विधानसभा क्षेत्रातील संघटनात्मक कामाचा आढावा सादर केला.

बैठकीदरम्यान रोशन लांडे यांची राजुरा शहर युवक काँग्रेस अध्यक्षपदी, निरंजन मंडल यांची राजुरा विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्षपदी तसेच सुजल वाढई यांची राजुरा तालुका एनएसयूआय अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात अरुण धोटे म्हणाले की, काँग्रेस पक्षाची विचारधारा आणि जनतेचा विश्वास अधिक दृढ करण्याची जबाबदारी युवकांच्या खांद्यावर आहे. संघटनेतील प्रत्येक कार्यकर्त्याला संधी देत गावागावात काँग्रेसचे जाळे मजबूत करणे हेच आपले ध्येय आहे. जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी युवक काँग्रेसने नेहमीच संघर्षशील भूमिका घ्यावी. नव्या पदाधिकाऱ्यांनी पदाचा सन्मान राखत प्रामाणिकपणे संघटन वाढीसाठी आणि समाजहितासाठी कार्य करावे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच विविध जनआंदोलनांमध्ये युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.बैठकीचे आयोजन राजुरा तालुका युवक काँग्रेस समितीचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केले. यावेळी राजुरा काँग्रेसचे शहराध्यक्ष हरजीतसिंग संधू, नगरसेवक एजाज अहमद, प्रणय लांडे, मधुकर झाडे, सरपंच सूरज माथनकर, तालुका उपाध्यक्ष रवी करमंकर, श्रीनिवास, रणजित पिंपळकर यांच्यासह युवक काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते.

बैठकीत आगामी संघटनात्मक कार्यक्रम, सदस्य नोंदणी अभियान, युवकांशी संवाद वाढविणे, तसेच स्थानिक जनतेच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी कृती आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करून नियोजन करण्यात आले. उपस्थित कार्यकर्त्यांनी संघटन अधिक मजबूत करण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.





  Print






News - Chandrapur




Related Photos