महत्वाच्या बातम्या

 आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेवरून नागरिक आक्रमक : अधिकाऱ्यांच्या पाहणीदरम्यान संतोष ताटीकोंडावार यांनी विचारला जाब


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आलापल्ली : गडचिरोली जिल्ह्याच्या दळणवळणासाठी जीवनवाहिनी ठरलेल्या आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील सहा वर्षांपासून रखडले आहे. निकृष्ट दर्जाचे काम, भ्रष्टाचार आणि अनियमिततेच्या आरोपांमुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिक्षक अभियंता विवेक नवले आणि कार्यकारी अभियंता प्रफुल केळकर यांनी या महामार्गाची पाहणी केली.

पाहणीदरम्यान जनकल्याण समजोन्नती अन्याय भ्रष्टाचार निवारण समितीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष संतोष ताटीकोंडावार यांनी अधिकाऱ्यांची भेट घेऊन रस्त्याच्या दुरवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या सहा वर्षांपासून महामार्गाच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता सुरू असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

रस्त्याच्या कामाची तातडीने चौकशी करून संबंधित कंत्राटदार तसेच दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. आता केवळ पाहणी आणि आश्वासन नको, तर प्रत्यक्ष कृती आवश्यक आहे, अशी ठाम भूमिका संतोष ताटीकोंडावार यांनी मांडली. तसेच रखडलेला महामार्ग त्वरित दुरुस्त करून वाहतुकीसाठी सुरळीत खुला करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.

तेलंगणातून पाहणीसाठी येण्यावर नागरिकांचा संताप -
या पाहणीवेळी एक बाब नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली. अधिक्षक अभियंता विवेक नवले आणि कार्यकारी अभियंता प्रफुल केळकर हे पाहणीसाठी तेलंगणा राज्यातून आले होते. यावर संतोष ताटीकोंडावार आणि उपस्थित प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. साहेब, तुम्ही या रस्त्याची पाहणी करण्यासाठी अधूनमधून तेलंगणातून येता; मात्र आम्हाला दररोज याच खड्डेमय रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो, अशा शब्दांत संतोष यांनी अधिकाऱ्यांसमोर नागरिकांच्या भावना व्यक्त केल्या.

विद्यार्थ्यांपासून रुग्णांपर्यंत सर्वांनाच फटका -
नागरिकांनी अधिकाऱ्यांसमोर आपल्या समस्या मांडताना सांगितले की, रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत पोहोचता येत नाही. अपघाताचा धोका कायम असतो. गर्भवती महिला, गंभीर रुग्ण आणि आपत्कालीन परिस्थितीतील नागरिकांना रुग्णालयात पोहोचवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा रुग्णवाहिकाही या मार्गावर अडकून पडते.

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मालवाहतूक विस्कळीत झाली असून शेतकरी, व्यापारी आणि व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. हा राष्ट्रीय महामार्ग आहे की खड्ड्यांचे संग्रहालय, हेच समजत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया संतोष ताटीकोंडावार आणि प्रवाशांनी व्यक्त केली.

अधिकाऱ्यांकडून कामाला गती देण्याचे आश्वासन -
पाहणीनंतर अधिक्षक अभियंता विवेक नवले यांनी महामार्गाच्या कामाला गती देण्याचे तसेच कामाचा दर्जा सुधारण्याचे आश्वासन दिले. मात्र गेल्या सहा वर्षांतील अनुभवामुळे नागरिकांचा केवळ आश्वासनांवर विश्वास राहिलेला नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

संतोष ताटीकोंडावार यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की, जर लवकरात लवकर रस्ता सुरळीत करण्यात आला नाही आणि दोषींवर कारवाई झाली नाही, तर राष्ट्रीय महामार्गावर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

आलापल्ली-सिरोंचा हा राष्ट्रीय महामार्ग तेलंगणा आणि छत्तीसगड राज्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या दुरवस्थेमुळे जिल्ह्याच्या विकासावरही परिणाम होत असून नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos