महत्वाच्या बातम्या

 ब्रह्मपुरीत पानटपरीवर अन्न सुरक्षा विभागाचा छापा; खर्रा, सुगंधी तंबाखू व मशीन जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरात प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई करत खर्रा, सुगंधी तंबाखू आणि त्याच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे मशीनसह एकूण ३१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी संबंधित दुकानदाराविरुद्ध भारतीय न्याय संहिता अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने २ जुलै २०२६ रोजी ब्रह्मपुरी येथील धनेश पान सेंटर, टी स्टॉल अँड कोल्डड्रिंक सेंटर येथे छापा टाकला. तपासणीदरम्यान दुकानात प्रतिबंधित खर्रा, सुगंधी तंबाखू तसेच त्याच्या निर्मितीसाठी वापरले जाणारे मशीन साठवून विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत धनेश रंजन राखडे यांच्याकडून प्रतिबंधित अन्नपदार्थ जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या खर्रा, सुगंधी तंबाखू व मशीनची एकूण किंमत ३१ हजार ५०० रुपये इतकी आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा व विक्री केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध एफआयआर क्रमांक ५५३/२०२६ नोंदविण्यात आला असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४ आणि २७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई संयुक्त आयुक्त (अन्न) के. आर. जयपूरकर आणि सहाय्यक आयुक्त (अन्न) पी. ए. उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी मेघा एन. फाळके यांनी उमेश कापगते, कुणाल मुळे, प्रणय कांबळे यांच्या सहकार्याने केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos