शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्याचे आवाहन : खरीप हंगामापूर्वीच जिल्ह्यातील रेशीम शेतकरी झाले लखपती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : रोजगारासाठी ग्रामीण भागातून शहरांमध्ये होणारे मोठ्या प्रमाणात स्थलांतर, पारंपारिक पिकांमधून कमी होत चाललेले उत्पन्न, निर्सगाचा लहरीपणा, वाढत असलेली बेरोजगारी या सर्व समस्यांवर रेशीम शेती हा रामबाण ऊपाय ठरु शकतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रेशीम शेतीकडे वळावे, असे आवाहन जिल्हा रेशीम विकास अधिकारी अनिलकुमार ढोले यांनी केले आहे. खरीप हंगाम सुरु झाला असून जेमतेम पारंपारीक पिकांची लाडवडीस सुरुवात झाली असतांना जिथे शेतकऱ्यांजवळ उत्पन्न देणारे कुठलेही पीक हाती नाही, तिथे जिल्ह्यातील रेशीम शेतकऱ्यांनी रेशीम कोष विकून भरघोस उत्पन्न मिळवले आहे.
रेशीम कोषाचे पीक केवळ एक महिन्यांचे असते, एक एकर क्षेत्रावर शेतकरी वर्षभरात किमान चार पीके घेऊ शकतो. म्हणजेच जिथे पांरपारिक पीके घेणाऱ्या शेतकऱ्याजवळ वर्षातून केवळ दोन वेळा पैसे येतात तिथे रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांजवळ वर्षातून किमान चार वेळा पैसे येतात. नागपूर जिल्ह्यातील बरेच शेतकरी रेशीम शेती करुन त्यांचे उत्पन्न दुप्पटच नाही तर तिप्पट करीत आहेत.
खरीप हंगामापूर्वीच जिल्ह्यातील रेशीम शेतकरी झाले लखपती -
नागपूर ग्रामीण तालुक्यातील देवळी (गुजर) येथील शेतकरी शिवाजी झोडे यांनी जून- २०२६ मध्ये रेशीम किटकांचे संगोपनास सुरुवात करुन २० जुलैला ७३३ रूपये प्रति किलो भावाने १४३.८९० किलो रेशीम कोषांची विक्री करुन रू.१ लाख ४ हजार ४१६ रूपयांचे उत्पन्न मिळवले आहे. पारशिवनी तालुक्यातील साकारला शेतकरी शैलेश रमेश वासनीक यांनी १५ जून ते १३ जुलै या एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत रेशीम किटकांचे संगोपन करुन कोष उत्पादन केले आहे. त्यास ६७५ रूपये प्रति किलो प्रमाणे दर मिळून १५७.४०० किलो रेशीम कोषांची विक्री करुन १ लाख ६ हजार २४५ रूपयांचे उत्पन्न मिळविले आहे.
विशेष बाब म्हणजे वरील उत्पन्नाचे आकडे हे केवळ जुलै- २०२६ या एका महिन्याच्या एका पीकाचे आहेत. या प्रकारे रेशीम शेतकरी हा वार्षिक किमान चार पीके घेऊ शकतो. रेशीम शेतीच्या अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय, हातमाग मंडळ प्रशासकीय इमारत, उमरेड रोड, नागपूर येथे संपर्क साधावा.
News - Nagpur




Petrol Price




