२५ जुलैपासून वरोरा येथे वृक्षारोपण प्रेरणा सप्ताहाचा शुभारंभ

- मुंबई शिक्षक आमदार ज. मो. अभ्यंकर यांच्या हस्ते उद्घाटन : गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सत्कार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वरोरा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शिक्षक सेनेच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या वृक्षारोपण प्रेरणा सप्ताहाचा शुभारंभ शनिवार, २५ जुलै रोजी वरोरा येथे होत आहे. मुंबई शिक्षक आमदार तथा महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष मा. ज. मो. अभ्यंकर यांच्या हस्ते या अभियानाचे उद्घाटन होणार असून, यावेळी वरोरा शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या २७ जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त राज्यभर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षक सेनेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही वृक्षारोपण प्रेरणा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिक्षक सेना गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात वृक्षारोपण प्रेरणा सप्ताह साजरा करत आहे. या अभियानातून लाखो वृक्षांची लागवड करण्यात आली असून, केवळ वृक्षारोपणापुरतेच न थांबता त्यांचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण करण्यावरही विशेष भर देण्यात आला आहे. पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाची राज्यभर दखल घेण्यात आली असून, गतवर्षी उत्कृष्ट वृक्षारोपण व संवर्धन कार्याबद्दल चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला होता.
यंदा चंद्रपूर जिल्ह्यातील वृक्षारोपण प्रेरणा सप्ताहाचे आयोजन शिवसेना जिल्हा संघटक, वरोरा नगरसेवक तथा सभापती मनीष जेठानी आणि शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष राजेश नायडू यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे. शनिवार, २५ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता अभ्यंकर स्कूल, वरोरा येथे या अभियानाचा शुभारंभ होणार असून, शिक्षक सेना विभागाध्यक्ष गंगाधर नाकाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
कार्यक्रमात वरोरा परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार मा. ज. मो. अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्याचबरोबर शिक्षक सेना पदाधिकारी, शिक्षक, शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांना पर्यावरण संरक्षण, सामाजिक बांधिलकी, वृक्षसंवर्धनाचे महत्त्व तसेच संघटनात्मक कार्याबाबत ते मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमासाठी सकाळी १०.०० वाजता शिवसेना जनसंपर्क कार्यालय, मेन रोड, वरोरा येथे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच शिक्षक, शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पर्यावरण संवर्धनाच्या या अभियानात सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन शिवसेना जिल्हा संघटक मनीष जेठानी आणि शिक्षक सेना जिल्हाध्यक्ष राजेश नायडू यांनी केले आहे.
पर्यावरण संरक्षणाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि वृक्षलागवडीबरोबरच वृक्षसंवर्धनाची जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाकडे वरोरा शहरासह संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
News - Chandrapur




Petrol Price




