महत्वाच्या बातम्या

 सफाई कामगारांच्या सन्मानासाठी भव्य सेवा गौरव दिन : १,२०० लाभार्थ्यांना ई-रिक्षा, शिलाई मशीन व सायकलींचे वाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : समाजाच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची जबाबदारी खांद्यावर घेऊन ऊन, पाऊस, तहान-भूक यांची पर्वा न करता आयुष्यभर सेवा करणाऱ्या सफाई कामगारांच्या कष्टाचा गौरव करण्यासाठी आज २२ जुलै भव्य सेवा गौरव दिन आयोजित करण्यात आला आहे. इमामवाडा आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात होणाऱ्या या कार्यक्रमात सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याबरोबरच त्यांच्या सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध योजनांचा लाभही वितरित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यसभा सदस्य मायाताई इवनाते, महापौर निताताई ठाकरे, आमदार कृष्णा खोपडे, मोहन मते, प्रविण दटके, संजय भेंडे, माजी खासदार अजय संचेती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी या कार्यक्रमाची माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुदर्शन, वाल्मिकी व मखियार समाजाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. 

लाडपागे समितीच्या अहवालाची प्रभावी अंमलबजावणी करून सफाई कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम करण्यात आले. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात विविध योजनांच्या माध्यमातून व्यापक प्रयत्न सुरू आहेत.

सामाजिक न्याय विभाग आणि इतर विभागांच्या समन्वयातून या सेवा गौरव दिनानिमित्त एकूण १,२०० लाभार्थ्यांना ई-रिक्षा, शिलाई मशीन आणि सायकलींचे वितरण करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना रोजगार आणि स्वयंरोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार असल्याचे डागोर यांनी सांगितले.

या लाभार्थ्यांमध्ये महिलांचाही जाणीवपूर्वक मोठ्या प्रमाणात समावेश करण्यात आला आहे. सुमारे ५०० महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार असून, त्यांना शिलाई व्यवसायासाठी आवश्यक प्राथमिक प्रशिक्षणही दिले जात आहे. महिलांना स्वावलंबी बनविणे आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सफाई कर्मचाऱ्यांचे समाजासाठीचे योगदान अमूल्य असून, त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यासोबतच त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. सेवा गौरव दिनाच्या माध्यमातून सन्मान, सामाजिक सुरक्षा आणि रोजगारनिर्मितीचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही शेरसिंग डागोर यांनी सांगितले.





  Print






News - Nagpur




Related Photos