महत्वाच्या बातम्या

 कृषी पदवी प्रवेश प्रक्रियेचा बिगुल : सीईटी कक्षाकडून ऑनलाइन अर्जांना सुरुवात


- चार कृषी विद्यापीठांतील नऊ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी २५ जुलैपर्यंत अर्ज; कृषी शिक्षणातून करिअरच्या नव्या संधी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) कक्षाने शैक्षणिक वर्ष २०२६-२०२७ साठी राज्यातील कृषी पदवी अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची (कॅप) घोषणा केली असून, राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमधील नऊ व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज व नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांना २५ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि प्रवेश शुल्क भरण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे.

आधुनिक तंत्रज्ञान, कृषी क्षेत्रातील संशोधन, अ‍ॅग्री-टेक, अ‍ॅग्री-बिझनेस आणि कृषी उद्योजकतेला मिळणारी चालना यामुळे कृषी शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा कल लक्षणीयरीत्या वाढत आहे. कृषी शिक्षणाच्या माध्यमातून केवळ सरकारी नोकरीच नव्हे, तर संशोधन, कृषी-उद्योग आणि स्वयंरोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांनी या प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सीईटी कक्ष आणि कृषी विभागाने केले आहे.

चार कृषी विद्यापीठांतील प्रवेश प्रक्रिया पारदर्शक -
राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ (राहुरी), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ (दापोली) या चारही कृषी विद्यापीठांमधील व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सीईटी कक्षामार्फत पूर्णपणे ऑनलाइन आणि पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे.

या नऊ अभ्यासक्रमांना प्रवेश -
यंदा कृषी शाखेतील खालील नऊ व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाणार आहे. बी.एस्सी. (ऑनर्स) अ‍ॅग्रीकल्चर, बी.एस्सी. (ऑनर्स) हॉर्टिकल्चर, बी.एस्सी. (ऑनर्स) फॉरेस्ट्री, बी.टेक. (अ‍ॅग्रीकल्चरल इंजिनिअरिंग), बी.टेक. (फूड टेक्नॉलॉजी), बी.टेक. (बायोटेक्नॉलॉजी), बी.एस्सी. (ऑनर्स) कम्युनिटी सायन्स, बी.एस्सी. (ऑनर्स) अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट, बी.एफ.एस्सी. (फिशरीज सायन्स/मत्स्यविज्ञान)

२५ जुलै अंतिम मुदत -
सीईटी कक्षाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार २५ जुलै २०२६ ही ऑनलाइन नोंदणी, अर्ज सादर करणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि शुल्क भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अंतिम क्षणाची वाट न पाहता वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेशासाठी आवश्यक पात्रता -
प्रवेशासाठी उमेदवाराने बारावी विज्ञान शाखा (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र किंवा गणित) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच राज्य सीईटी कक्षामार्फत आयोजित एमएचटी-सीईटी २०२६ (पीसीबी किंवा पीसीएम) अथवा नीट किंवा आयसीएआर-एआयईईए परीक्षा दिलेली असणे अनिवार्य आहे.

याशिवाय शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी, ७/१२ उताराधारक, बारावीत कृषी विषय घेतलेले विद्यार्थी तसेच एनसीसी आणि क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना शासनाच्या नियमानुसार अतिरिक्त वेटेज गुणांचा लाभ मिळणार आहे.

कृषी शिक्षणातून उज्ज्वल करिअर -
बदलत्या काळात कृषी शिक्षणाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे अ‍ॅग्री-टेक, अ‍ॅग्री-बिझनेस, जैवतंत्रज्ञान, अन्न प्रक्रिया उद्योग आणि कृषी संशोधन क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत.

कृषी पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना एमपीएससी आणि यूपीएससी स्पर्धा परीक्षा, कृषी अधिकारी (वर्ग-१ व वर्ग-२), बँकांमधील अ‍ॅग्रीकल्चर फील्ड ऑफिसर (एएफओ), कृषी प्रक्रिया उद्योग, बियाणे व खत कंपन्या तसेच संशोधन संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. याशिवाय स्वतःचा अ‍ॅग्री-स्टार्टअप, कृषी उद्योग किंवा शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीओ) स्थापन करून स्वयंरोजगाराचाही मार्ग खुला आहे.

कृषी क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि उद्योजकतेमुळे या क्षेत्राचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश प्रक्रिया महत्त्वाची संधी असून, पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सीईटी कक्ष आणि कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos