गडचिरोली येथील महिला व बाल रुग्णालयात आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सिकलसेल व थॅलेसेमिया तपासणी शिबिर संपन्न


- लवकरच गडचिरोलीत CVS तपासणी सेंटर सुरू होणार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांची घोषणा
विदर्भ न्यूज एक्सरेस
प्रतिनिधी / गडचिरोली : महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे (२२ जुलै) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिकलसेल व थॅलेसेमिया तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात गरोदर माता (ANC Mothers) आणि सिकलसेल (SS) रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. सदर उपक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे माता बाल संगोपन अधिकारी डॉ. माधव शिंदे, सामान्य रुग्णालयाच्या अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. छाया उईके, महिला व बाल रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. माधुरी किलनाके, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत आखाडे, RMO डॉ. अमरीश तिवारी आणि अधिपरिचारिका अधिकारी कविता पोतराजवार प्रामुख्याने उपस्थित होते.
नियमित तपासणी व समुपदेशनाचे आवाहन -
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉ. माधव शिंदे यांनी सांगितले की, सिकलसेल रुग्णांनी आपली नियमित आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे. तसेच सर्व गरोदर मातांनी (ANC) गर्भावस्थेच्या १२ आठवड्यांच्या आत सिकलसेल व थॅलेसेमियाची तपासणी करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. ही तपासणी पॉझिटिव्ह आल्यास त्वरित सीव्हीएस (CVS) टेस्ट करून पुढील वैद्यकीय उपचार सुरू करावेत. डॉ. छाया उईके यांनी सर्व वैद्यकीय अधिकारी, ANM, स्टाफ नर्स आणि आशा स्वयंसेविकांना सिकलसेल, थॅलेसेमिया रुग्ण तसेच गरोदर मातांना या आजाराच्या गांभीर्याबाबत व्यापक समुपदेशन करण्याचे निर्देश दिले.
गडचिरोलीत होणार CVS सेंटर सुरू -
आपल्या अध्यक्षी भाषणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांनी जिल्ह्यासाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्या म्हणाल्या, गडचिरोली जिल्ह्यातील सिकलसेल व थॅलेसेमियासारख्या आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी लवकरच महिला व बाल रुग्णालय येथे कोरिओनिक व्हिलस सॅम्पलिंग (CVS - Chorionic Villus Sampling) तपासणी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यामुळे गर्भाशयातील बाळाला हा आजार आहे की नाही, हे वेळीच ओळखून सिकलसेल व थॅलेसेमियाग्रस्त बालकांचा जन्म रोखण्यास मोठी मदत होईल.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम -
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सिकलसेल समुपदेशक रामटेके PHN,नीता बालपांडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ स्वप्नील चापले, रचना फुलझेले तसेच HLL टीमच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. शिबिराला गरोदर माता व रुग्णांचा मोठा प्रतिसाद मिळाला. असे डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली यांनी कळविले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




