गोंडवाना सैनिकी विद्यालयात लोकनेते अजितदादा पवार यांची जयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालय, गडचिरोली येथे लोकनेते तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या जयंतीचा अधिकृत शासकीय जयंती कार्यक्रमांमध्ये समावेश केल्यानंतर राज्यभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून, त्याच अनुषंगाने विद्यालयातही जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यानंतर उपस्थितांनी त्यांच्या कार्याला अभिवादन करत दोन मिनिटे मौन पाळले. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विद्यालयाचे प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक अजय वानखेडे हे होते.
यावेळी प्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक जीवनाचा आढावा घेतला. राज्याच्या विकासासाठी त्यांनी पायाभूत सुविधा, सिंचन, कृषी, शिक्षण, क्रीडा आणि ग्रामीण विकास क्षेत्रात दिलेल्या योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. सार्वजनिक जीवनात शिस्त, कार्यतत्परता, निर्णयक्षमता आणि जनसेवेची भावना या गुणांचा प्रत्येक विद्यार्थ्याने आदर्श घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अजितदादा पवार यांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगते व्यक्त केली. त्यांच्या नेतृत्वगुणांवर, विकासाभिमुख दृष्टिकोनावर तसेच महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेल्या कार्यावर विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला. उपस्थितांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या लोकहितवादी विचारांचा आदर्श जीवनात अंगीकारण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




