महत्वाच्या बातम्या

 वैरागड परिसरात रानटी हत्तींचा धुमाकूळ : धानपिकांचे मोठे नुकसान, पाच तास वाहतूक बंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : आरमोरी तालुक्यातील सिर्सी–गणेशपूर जंगल परिसरातून आलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने वैरागड शेतशिवारात धुमाकूळ घालत अनेक शेतकऱ्यांच्या धानपिकांचे मोठे नुकसान केले आहे. उगवलेले धानपन्हे तुडवून टाकल्याने खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. हत्तींच्या सततच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतीकामांवरही त्याचा परिणाम होत आहे.

शुक्रवारी हत्तींचा कळप वासाळा–रामाळा जंगल परिसरात असल्याची माहिती वनविभागाला मिळताच मानव–वन्यप्राणी संघर्ष टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात आल्या. खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजेपर्यंत वैरागड–रामाळा आणि वैरागड–ठाणेगाव या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली. जवळपास पाच तास वाहतूक ठप्प राहिल्याने दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. हत्तींचा कळप चामोर्शी जंगलाच्या दिशेने रवाना झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

हत्तींच्या कळपाने वैरागड परिसरातील अनेक शेतांमध्ये घुसून धानपिकांची नासधूस केली. वैरागड येथील शेतकरी संजय खंडारकर यांच्या शेतातील धानपिकाचेही नुकसान झाल्याची नोंद वनविभागाने घेतली आहे. नुकतीच उगवलेली धानाची रोपे तुडवल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच त्यांच्यासमोर नव्या अडचणी उभ्या ठाकल्या आहेत.

घटनेनंतर वनविभागाने ध्वनिक्षेपकाद्वारे गावोगावी जनजागृती सुरू केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रात्रीच्या वेळी शेतात किंवा जंगलालगतच्या परिसरात विनाकारण जाऊ नये, हत्तींच्या हालचाली दिसून आल्यास तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी आणि कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

वनकर्मचारी आणि हुल्ला पथक हत्तींच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवून असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

क्षेत्र सहायक सतीश गजबे म्हणाले, ज्या शेतकऱ्यांच्या धानपिकाचे प्रत्यक्ष नुकसान झाले आहे, त्यांना शासनाच्या नियमानुसार भरपाई मिळवून देण्यात येईल. मात्र, किरकोळ नुकसान झालेल्या घटनांचा सोशल मीडियावर अनावश्यक गाजावाजा करू नये. नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करून सतर्कता बाळगावी.

हत्तींच्या वाढत्या वावरामुळे वैरागड आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने परिस्थितीवर लक्ष ठेवत नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos